शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ः माहिती सेवा समितीच्या मागणीला अखेर यश
शिक्रापूर (पुणे) – करंदीफाटा ते तळेगाव ढमढेरे येथील रस्त्याच्या साइडपट्ट्या व डांबरी रस्ता एका कंपनीकडून केबल गाडण्यासाठी खोदल्याप्रकरणी माहिती सेवा समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात खोदकाम करणाऱ्या कंपनीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
श्रीनिवास एंटरप्राइजेस भोसरी कंपनीचे ठेकेदार राजू राठोड (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पुणे महानगर विकास प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता भगवानदास रघुनाथ कुसाळे यांनी फिर्याद दिली. शिरूर तालुक्यातील राज्य महामार्ग 55 मधील चाकणरोड (करंदी फाटा) ते तळेगाव ढमढेरे औद्योगिक क्षेत्रातील या रस्त्याचे काम सन 2017 ते 2019 यादरम्यान मेसर्स देवकर अर्थ मुव्हर्स खराडी पुणे यांच्याकडून करण्यात आले. त्यानंतर या रस्त्याचे बेकायदेशीरपणे खोदकाम करण्यात आल्याचे माहिती सेवा समितीचे चंद्रकांत वारघडे यांनी वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील केला.
कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्या सूचनेनुसार पुणे महानगर विकास प्राधिकरण या विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याची साइडपट्टी उकरून, डांबरी रस्ता खोदून टाटा टेलिकॉम केबल वर्क्स या कंपनीची केबल गाडण्याचे काम चालू होते. तेथील कामगारांना विचारपूस केली असता सदरचे काम हे टाटा टेलिकॉम केबल वर्क्स कंपनीचे असून श्रीनिवास इंटरप्राईजेस भोसरी कंपनीचे ठेकेदार राजू राठोड यांचे सांगण्यावरून काम सुरु असल्याचे समजले. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.