मुंबई – उद्धव ठाकरे सहकाऱ्यांना घरगडी समजतात. त्यांचे राम मंदिराचे प्रेम बेगडी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी दिला.
यानंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. उद्धव ठाकरे आज कल्याण दौऱ्यावर असून त्यांनी शिंदे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली होती. या टीकेवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचे राममंदिराचे प्रेम बेगडी आहे.
यापूर्वी तेच म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नहीं बतायेंगे. पण आता मोदींनी मंदिर तयार केले आणि तारीख पण जाहीर केली आहे. राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. त्यामुळे तो राजकीय विषय होऊ शकत नाही.
तसेच लोकशाहीत दौरा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी. जे स्वतःचे कुटुंब एकत्र ठेवू शकले नाहीत. ज्यांनी केवळ माझे कुटुंब माझी जवाबदारी पाहिली, ते आज घराणेशाहीवर बोलत आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या नेत्यांना, सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. ते आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात, या शब्दांत त्यांनी घराणेशाहीवरील टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.