नवी दिल्ली – तैवानच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या बहुचर्चित निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे उमेदवार लाय चिंग-ते हे विजयी झाले आहेत. चीन आणि तैवानमधील तणाव वाढत असतानाच ते तैवानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. मावळत्या अध्यक्षा त्साई इंग वेन यांनी २०१६ पासून सलग दोन वेळा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीसाठी हा सलग तिसरा विजय आहे.
तैवानच्या निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार लाय यांना ५ दशलक्ष म्हणजे एकूण मतांच्या ४० टक्क्यांइतकी मते मिळाली होती. कुनमिंगतांगचे उमेदवार हौ-यू जी यांना ३३ टक्के तर तैवान पीपल्स पार्टीचे उमेदवार को-वेन इ यांना २६ टक्के मते मिळाली. त्यामुळे लाय यांना बहुमतासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षाही जास्त मते मिळाली, असे तैवानमधील प्रसिद्धी माध्यमांनी म्हटले आहे.
लाय यांनी पूर्वी तैनान शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तैवानचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी देशाची संरक्षण, अर्थकारण आणि लोकशाहीवादी मित्रांबरोबरचे संबंध अधिक भक्कम करण्याची ग्वाही दिली आहे. निवडणुकीच्या काळात लागू केलेले प्रतिबंध आणि खाडीतील जैसे थे स्थिती कायम ठेवली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
आपल्या नवीन सरकारमध्ये पक्षाची बंधने मानण्यापेक्षा क्षमता ओळखून नवीन सरकारमध्ये सामावून घेतले जाईल. तसे केले तरच आव्हानांचा प्रभावीपणे मुकाबला केला जाईल. आपले सरकार खुले आणि सर्वसमावेशक असेल. त्यामुळे देशांतर्गत आणि बाह्य आव्हानांविरोधात तैवानी जनतेला एकत्र ठेवले जाऊ शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
चीनचा थयथयाट
लाय यांच्या निवडीमुळे चीनचा थयथयाट होणार हे निश्चित आहे. अध्यक्षपदासाठी केएमटी आणि हौ-यू जी यांना चीनचे प्राधान्य राहिले असते. लाय हे तैवानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे हट्टी नेते आहेत. त्यांच्यामुळे चीन आणि तैवानदरम्यानच्या खाडीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, असेही चीनने म्हटले होते. अलिकडच्या काळात तैवानवर दबाव आणण्यासाठी चीनने अनेक उद्योग केले आहेत. तैवानच्या हवाई आणि सागरी हद्दीमध्ये सातत्याने चीनकडून घुसखोरी केली जात आहे. तसेच तैवान-चीनचे एकिकरण बळाने करण्याची उघड धमकीही दिली जाते आहे.