करक (पाकिस्तान) – शेकडो कट्टरवाद्यांच्या जमावाने हिंदू मंदिर पेटवून दिल्याची घटना पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांतातल्या करक जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून त्यात शेकडोंचा जमाव मंदिराच्या भिंती आणि छत पाडताना दिसत आहेत.
पाकिस्तानात अशा प्रकारच्या घटना पूर्वीही घडलेल्या होत्या. पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याबद्दल पाकिस्तान आणि जगभरातील मानवी हक्क कार्यकर्त्यांकडून तीव्र टीका होत आहे.
“स्थानिक धर्मगुरुंच्या नेतृत्वाखालील जमावाने खैबर पख्तुनवातल्या करक जिल्ह्यातील हिंदू मंदिर उद्ध्वस्त केले. या मंदिराच्या उभारणीसाठी स्थानिक हिंदूंनी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेतलेली होती. मात्र तरिही हे मंदिर उद्ध्वस्त केले जात असताना पोलीस आणि प्रशासन मूकदर्शक बनून राहिले होते.’ असे ट्विट कराचीतील पत्रकार मुबाशीर झैदी यांनी केले आहे.
हा जमाव धार्मिक घोषणा देत होता. म्हणूनच पोलिसांनी त्यांना अडवले नाही, ही एक लज्जास्पद गोष्ट आहे,असे लंडनमधील मानवी हक्क कार्यकर्ते शमा जुनैजो यांनी म्हटले आहे.
सामाजिक संशोधिका आणि पत्रकार रबिया मेहमूद यांनीही या घटनेवर तीव्र टीका करणारे ट्विट केले आहे. भारतात हिंदुत्व वाढत असल्यानेच हे कृत्य केले गेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांना कसे वागवले जाते, याचेच हे ठळक उदाहरण असल्याचे मानवी हक्क कार्यकर्ते इहतेशाम अफगाण यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.