प्रवीण तरडे दिग्दर्शित “मुळशी पॅटर्न’ने महाराष्ट्रात धमाका केला होता. या चित्रपटात मुळशी भागात शेतजमिनी विकल्यानंतर उद्भवलेली विषण्ण करणारी गुन्हेगारी दुनिया दाखविण्यात आली होती. आता या चित्रपटातचा “गन्स ऑफ नॉर्थ’ हा हिंदी रिमेक येणार आहे. यात ओम भूतकरने साकारलेली भूमिका सलमानची बहीण अर्पिता खानचा नवरा आयुष शर्मा साकारणार आहे.
या रिमेकची सर्व तयारी पूर्ण झाली असून, एप्रिलमध्ये चित्रीकरण सुरू होणार होते. पण, लॉकडाऊनमुळे हा बेत रद्द करावा लागला. आता लॉकडाऊन उठल्यानंतर चित्रीकरणाला वेग येणार आहे. आयुष शर्माने यापूर्वी “लव्हयात्री’ चित्रपटातून डेब्यू केले होते. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. म्हणूनच सलमान खानने आपल्या आयुषसाठी “मुळशी पॅटर्न’ची निवड केली आहे. आता त्याला आयुष किती न्याय देतो ते पाहावे लागेल.
या चित्रपटात सलमान खानदेखील झळकणार आहे. यात उपेंद्र लिमये यांनी साकारलेला पोलीस सलमान साकारण्याची शक्यता आहे. तर प्रवीण तरडे यांनी साकारलेला डॉन कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. विशेष बाब म्हणजे प्रवीण तरडेही या चित्रपटाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाच्या जबाबदारीवर असणार आहेत. पण ते नेमकी कोणती जबाबदारी स्वीकारताहेत ते जाहीर करण्यात आलेले नाही.