दिवसभरात 89 जणांना लागण; दोघांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांच्या संख्येने गुरुवारी (दि. 11) एक हजाराची संख्या ओलांडली. बाधितांची संख्या 1017 वर पोहचली. दिवसभरात 89 जणांना बाधा झाली. त्यामध्ये शहरातील 86 तर, बाहेरील तिघांचा समावेश आहे. शहरातील रहिवाशी असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे.
शहरात पहिला रुग्ण 12 मार्च रोजी आढळून आला होता. त्यानंतर आठवडाभरात हा आकडा 12 जणांवर पोहोचला होता. त्यानंतर तब्बल 11 दिवस शहरात नव्याने एकही रुग्ण न आढळल्याने शहर करोनामुक्तीचे दिशेने निघाले होते. त्यातच दिल्ली येथे झालेल्या मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेल्या काही व्यक्तींना बाधा झाल्यानंतर शहरात बाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. त्यावर नियंत्रण येण्यापूर्वीच 19 मे पासून शहरातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आणण्यात आल्याने शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याने बाधितांचा आकडा झपाटल्याने वाढला.
बुधवारी 272 जणांचे चाचणी अहवाल प्रलंबित होते. त्यांचे अहवाल आज महापालिकेला प्राप्त झाले. त्यानुसार एकुण 89 जणांना बाधा झाली आहे. हे बाधित रुग्ण भाटनगर, पिंपरी, दापोडी, वाकड, आनंदनगर- चिंचवड स्टेशन, खराळवाडी, काळभोरनगर, नेहरूनगर, काळेवाडी, नाणेकरचाळ, बौध्दनगर, चिंचवडगाव, भोसरी, अजंठानगर, वाल्हेकरवाडी, दिघी, बोपखेल, मोरवाडी येथील आहेत. शहराबाहेरील रुग्ण हे औंध, चाकण आणि केंदूर पाबळ येथील आहेत.
आज मृत झालेले 62 वर्षीय पुरुष हे कासारवाडी येथील रहिवाशी होते. तर खराळवाडी येथील रहिवाशी असलेल्या 60 वर्षीय महिलेचाही आज मृत्यू झाला. या दोघांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. आजच्या दोघांसह शहरातील 18 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहराबाहेरील 19 व्यक्ती दगावले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या 37 वर पोहोचली आहे. आज पुन्हा दिवसभरात 205 करोना संशयीत वायसीएममध्ये दाखल झाले असून 276 जणांचे चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.
बाधितांचे शतक पूर्ण
रात्री उशीरा महापालिकेच्या डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार बाधितांचे आज दिवसभरात शतक पूर्ण झाले आहे. एकाच दिवसात 118 व्यक्तींना करोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याशिवाय शहराबाहेरील तिघांना लागण झाल्यामुळे आज दिवसभरात उच्चांकी 121 जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेकडून आकड्यांचा खेळ
बुधवारी (दि.10) सायंकाळी महापालिकेने 78 रुग्ण बाधित असल्याचे दाखविले होते. त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत 90 रुग्ण बाधित असल्याचे डॅशबोर्डवर दाखविण्यात आले होते. तर गुरुवारी सायंकाळी सात वाजता दिवसभरात 100 रुग्ण बाधित असल्याचे दिसून येत होते. मात्र महापालिकेने 86 रुग्ण बाधित असल्याचे दाखविण्यात येत होते. वास्तविक पाहता गुरुवारचा बाधितांचा आकडा 110 असणे आवश्यक होते. डॅशबोर्ड आणि महापालिकेने पाठविलेल्या प्रेसनोटमधील आकड्यांमध्ये तब्बल 24 रुग्णसंख्येचा फरक येत आहे. महापालिकेकडून रुग्णसंख्येची लपवाछपवी सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.