Rana couple – मातोश्री बाहेर करण्यात आलेल्या हनुमान चालीसा पठण प्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आलेल्या कारवाईच्या आदेशांना उच्च न्यायालायने स्थगिती दिली.
तसेच 21 फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरु न करण्याचे निर्देश देखील विशेष सत्र न्यायालयाला देण्यात आले आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणातील गुन्हे रद्द करण्याची याचिका केली होती.
ही याचिका विशेष सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आली होती. ‘मातोश्री’बाहेरील हनुमान चालीसा पठण आंदोलनप्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली. एफआयआर दाखल होण्यापूर्वीच केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा राणांचा दावा होता.