सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या, शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील रे नगर प्रकल्पातील असंघटित कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील ३० हजारपैकी १५ हजार घरकुलांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
रे नगरातील पाच घरकूल लाभार्थींना प्रातिनिधीक स्वरूपात चावी वाटप आणि लोकार्पण सोहळा सकाळी साडेदहा वाजता पार पडणार आहे. तत्पूर्वी, प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक, माजी आमदार नरसय्या आडम यांचे पाच मिनिटांचे प्रास्ताविक होईल. स्वागत, सत्कार होऊन प्रकल्पाची काही मिनिटांची चित्रफीत दाखविली जाईल. त्यानंतर राज्यातील व केंद्रातील काही प्रमुख मंत्र्यांची भाषणे होतील. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंघटित कामगारांशी संवाद साधणार आहेत.