जगात अनेक विचित्र जमाती आढळतात. ते आजही त्यांच्या परंपरांचे पालन करतात. या जमातींच्या काही परंपरा खूप विचित्र आहेत, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्ही थक्क व्हाल. अशाच परंपरांचे पालन करणारी एक जमात आफ्रिकेच्या जंगलात राहते. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या जमातीत मोठ्या पोटाच्या म्हणजेच ढेरपोट्या पुरुषांचा जास्त आदर केला जातो. जाणून घेऊया या अनोख्या जमातीबद्दल…
ही जमात कुठे आढळते ?
ही अनोखी जमात आफ्रिकन खंडातील इथिओपियामध्ये आढळते. येथे ओमो व्हॅलीच्या जंगलात ही आदिवासी मंडळी राहतात. या जमातीतील पुरुष जाड होण्यासाठी आणि विशेषतः ढेरी वाढवण्यासाठी खूप मेहनत करतात. याशिवाय येथे लोक प्राण्यांचे रक्त पितात. जाड आणि ढेरपोट्या पुरुषांना इथे सुपरस्टारचा दर्जा दिला जातो. या जमातीला इथियोपियाची बोडी जमात असेही म्हणतात.
दुधासोबत ‘हे’ मिसळून पितात
ओमो व्हॅलीच्या जंगलात राहणार्या या जमातीचे लोक गाईच्या दुधासोबत रक्त पितात असे म्हणतात. एका रिपोर्टनुसार अनेक लोक दूध आणि रक्त एकत्र पितात. असे म्हणतात की, प्राण्याचे रक्त पिण्यासाठी हे लोक त्याला मारत नाहीत, तर त्याच्या शरीरातील नस कापून तेथून रक्त काढतात. येथे नवीन वर्षाच्या निमित्ताने कोयल नावाचा समारंभ आयोजित केला जातो. या समारंभात पुरुषांमध्ये स्पर्धा असते ज्यामध्ये अविवाहित पुरुषांना गायीचे रक्तमिश्रित दूध प्यावे लागते.
सहा महिने आधीच तयारी सुरू होते
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथील पुरुष ६ महिने आधीच तयारी सुरू करतात. या काळात तो कोणत्याही महिलेशी संबंध ठेवू शकत नाही. याशिवाय घराबाहेर पडण्यासही बंदी घालण्यात येते. या दरम्यान तो जनावरांचे रक्त आणि दूध पीत राहतो. एका कपमध्ये दोन लिटर दूध असते जे सूर्योदयाच्या वेळी पिले जाते.