रेडा – भरणेवाडी (ता. इंदापूर) येथील अक्षय भरणे यांनी साठ युवक मित्रांना फोन करून तब्बल 2 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करण्याची किमया करून दाखवली आहे. त्यामुळे 2 हजार कुटुंबांनी उपक्रमाचे स्वागत केले आहे.
भरणेवाडी येथील भरणे यांनी आपल्या मित्रांना फोनवरून मदतीचे आवाहन केले. 60 युवकांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत देऊ केली. या मदतीतून अंथुर्णे-भरणेवाडी येथील दोन हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्याचे ठरले.
त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला पाच किलो गहू, तीन किलो तांदूळ, एक तेल पुडा, चार साबण असे कीट तयार करण्यात आली आहेत.
दरम्यान या वस्तूंचे घरोघरी वाटप करण्यात आले. यावेळी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, भरणेवाडी सोसायटीचे चेअरमन आबासाहेब भरणे, अक्षय भरणे, आजी- माजी सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.