पुणे (प्रतिनिधी) : शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी चार ते साडेचार च्या सुमारास उपनगरांसह शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांमध्ये हा पाऊस झाला. तत्पूर्वी जोरदार सोसाट्याचा वारा सुटला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे शुक्रवारी आणि शनिवारी शहरातील विविध भागतील २०० पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झाले.
पुणे शहरात गेल्या दीड महिन्यात करोनाच्या विषाणू ने चांगलीच मुसंडी मारली आहे. त्यातच सलग दुसऱ्या दिवशी (शनिवारी) अवकाळी पावसाने देखील जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी (१ मे ) देखील शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे देखील १०० पेक्षा अधिक अधिक मोठी झाडे पडली होती. या पावसानंतर शहरातील सर्वच अग्निशमक दलाच्या १४ स्टेशनमधील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेउन रस्त्यावरील झाडे बाजूला काढण्यास सुरुवात केली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आणि अरबी समुद्रात चक्राकार वारे तयार झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात अवकाळी पाउस पडत आहे. त्यामुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शहराच्या अनेक भागात दुपारनंतर पाउस हजेरी लावत आहे. दोन दिवस झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी भिंती कोसळण्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
विेशेषतः शनिवार वाडा, विश्रामबाग परिसर, संचेती चौक, पोलिस आयुक्तालयातील अनेक जुनी झाडे कोसळली असल्याचे दिसून आले आहे. तसेच मंगळवार पेठ, रविवार पेठ, संगम पूल, सोमवार पेठ, शिवाजीनगर, स्वारगेट, कात्राज, बालाजीनगर, कसबा पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर न्यायालय परिसर, डेक्कन, कर्वेनगर, वारजे, सिंहगड, पर्वती, शहरातील सर्व मध्यवर्ती पेठा, उपनगरांमध्ये पावसामुळे सर्वांधिक झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.