अॅड. अमरेंद्र महाडिक यांनी मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली मागणी
बारामती (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटामुळे शहरातील दुकानदार तसेच व्यापारी आर्थिक संकटात सापडले असून बारामती नगरपरिषदेने गाळेधारकांचे चार महिन्यांचे जागाभाडे व घरपट्टी माफ करावी अशी मागणी अॅड. अमरेंद्र महाडिक यांनी केली आहे. मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरात लॉकडाऊन आहे. मार्च महिन्यापासून शहरातील व्यावसायिकांची दुकाने बंद आहेत. मार्च अखेरच्या अनुषंगाने दुकानदार अथवा व्यापारी यांच्या माध्यमातून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. मात्र यंदाच्या मार्चअखेर लॉकडाऊन परिस्थितीतून जात असल्याने छोटे-मोठे व्यवसायिक देखील आर्थिक संकटात सापडले आहेत.
व्यापारी वर्गाचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. इथून पुढील काळात लॉकडाऊन कालावधी किती असेल याबाबत देखील अनिश्चितता आहे. त्यामुळे लॉक डाऊन कालावधी संपल्यनंतर देखील व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी पुढील काही महिन्यांचा कालावधी जाईल असे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून या चार महिन्यांचे जागा भाडे तसेच घरपट्टी नगरपरिषदेने माफ करावी. तसेच पुढील एक वर्षाच्या कालावधिसाठी जागा भाडे व घरपट्टीत 50 टक्के सूट देण्यात यावी या मागणीचे निवेदन अॅड. अमरेंद्र महाडिक यांनी मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांना दिले आहे.