भिगवण (वार्ताहर) – भिगवणसह (ता. इंदापूर) परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा आनंदीत झाला आहे.
बॅंक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्राच्या नोंदीनुसार मागील दोन दिवसात सुमारे 76 मिलिमीटर पाऊस झाला आहे. या हंगामात एकूण 176 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती.
आता त्यापाठोपाठ मान्सूनचे आगमन झाले असून पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे या भागात आडसाली ऊस लागवड सुरू झाली असून सोयाबीन, कांदा आदी पिकांची पेरणी केली जात आहे.