शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे व उपसभापती विश्वास ढमढेरे या दोघांनी आपले सभापती व उपसभापती पदाचे राजीनामे पक्षाच्या आदेशानुसार दिले असल्याची माहिती शिरूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी बापू काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची 2017मध्ये निवडणूक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या अधिकृत पॅनलचे जास्त उमेदवार निवडून आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार यांच्या यांच्या आदेशानुसार बाजार समितीच्या सभपतीपदी शशिकांत दसगुडे, तर उपसभापती विश्वास ढमढेरे यांची निवड झाली होती. 2017अगोदर गेल्या पाच वर्षांच्या काळात बाजार समिती तोट्यात गेली होती. या तीन वर्षांच्या काळात बाजार समितीने मोठी प्रगती केली आहे.
समितीचे कर्ज फेडून, काटकसरी करून नफ्यात आणण्याचे काम केले असल्याचे रवींद्र काळे यांनी सांगितले; परंतु पक्षाच्या या धोरणानुसार इतरांनाही संधी देण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या सूचनेनुसार दसगुडे व ढमढेरे यांनी तालुका अध्यक्ष रवींद्र काळे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये इतर संचालकांना सभापती व उपसभापती पदासाठी संधी मिळणार आहे, याबाबत निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत. तर स्वेच्छेने राजीनामा दिल्याचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे उपस्थित होते.