शेतकऱ्यांचा ‘भाता’चा घास पावसाने हिरावला

खेड तालुक्‍यात पिकाचे मोठे नुकसान; नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

राजगुरूनगर – खेड तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील हाताशी आलेल्या भात पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तांदूळ उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदत मिळण्याची मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

खेड तालुक्‍यात सुरुवातीपासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. भात लावणीच्या वेळीच जोरदार पाऊस झाल्याने भात खाचरांसह पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळीच शेतकरी हवालदिल झाला तर आता पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. भात पीक चांगले आले असताना काढणीच्या वेळी दिवसाआड जोरदार अतिवृष्टी होत झाल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. भातपीक कापणीयोग्य झाले असताना पाऊस उघडत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास अस्मानी पावसाने हिरावून घेतला आहे.

खेड तालुक्‍यात सरासरी साडे आठ हजार हेक्‍टर क्षेत्रात भात पिकाची लावगड केली जाते. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्‍यात यावर्षी 7 हजार 242 हेक्‍टर क्षेत्रात भात पिकाची आणि त्याच प्रमाणात सोयाबीन पिकाची लावगड झाली आहे. सध्या, भात आणि सोयाबीनची काढणी सुरु असतानाच अधूनमधून जोरदार पाऊस पडत असल्याने या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यावर्षी तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस डेहणे, कुडे, आंबोली परिसरात पडला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खेड तालुक्‍यात जून महिन्यात 174 मिलीमीटर, जुलै महिन्यात 465.8 मिलीमीटर, ऑगस्ट महिन्यात 246.5 मिलीमीटर, सप्टेंबर महिन्यात 232.2 मिलीमीटर, ऑक्‍टोबर महिन्यात 175.3 मिलीमीटर, असा 1293.8 मिलीमीटर इतक्‍या उच्चांकी पावसाची नोंद झाली असून अजूनही पाऊस पडतच आहे.

अवकाळी पावसामुळे भात, सोयाबीन, बटाटा पिकाच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करून त्याचे पंचनामे तात्काळ करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागाच्यावतीने जिल्हा परिषद माजी सदस्य अरुण चांभारे, जिल्हा दूध संघाचे संचालक लक्ष्मण तिटकारा, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे, डेहणेचे सरपंच दत्ता खाडे, भोरगिरी-भीमाशंकर ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना वनघरे, धुवोलीचे माजी सरपंच पांडुरंग जठार, आव्हाटचे माजी सरपंच हरिभाऊ तळपे, शेतकरी प्रतिनिधी संदीप शेलार यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार मालती धोत्रे याना देण्यात आले.

पर्जन्यमान प्रमाण….
खेड तालुक्‍यात कृषी विभागाच्या नऊ मंडल विभागात जून ते ऑक्‍टोबर 2019 झालेले पर्जन्यमान मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे –
वाडा (1739.4 मिलि), राजगुरूनगर(959), कुडे (1844), पाईंट (1727.1), चाकण (1415.9), आळंदी (946), पिंपळगाव (907), कन्हेरसर (889), कडूस (1216). खेड तालुक्‍यातील तीन धारणक्षेत्रात जून ते ऑक्‍टोबर 2019 पर्यंत झालेला पाऊस- भामा आसखेड धरण (1922 मिलिमीटर), चासकमान धरण (1294), कळमोडी धरण (2380).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)