मुख्यमंत्री खोटे बोलतात काय ?

सासवड – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत जाहीरपणे सांगतात की, नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. कृषी पंचनाम्यात कोणत्याही प्रकारची आडकाठी केली जाणार नाही, अडथळे येणार नाही आणि दुसरीकडे पुरंदर तालुक्‍यातील प्रशासकीय अधिकारी मात्र वरिष्ठ पातळीवरून आदेशाची वाट पाहात हातावर हात ठेवून बसले आहेत.

मग, काय मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत काय, असा सवाल आता पुरंदरचे शेतकरी कृषी अधिकाऱ्यांना करू लागले आहेत. याबाबत पुरंदर तालुका कृषी अधिकारी अंकुश बर्डे यांच्याशी संपर्क साधला असता आज करू… उद्या करू, असे सांगितले जात असले तरी अद्यापही पंचनाम्याचा मुहूर्त साधला नसल्याचे समजते.

पुरंदर तालुक्‍यात गेल्या महिन्याभरापासून पावसाचा खेळ सुरू आहे. यामुळे तालुक्‍यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहेत. बाजरीची काढणी करून वाळायला टाकलेल्या बाजरीची कणसं भिजून त्याला कोंब फुटू लागले आहेत. तर, भुईमूग पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना शासकीय अधिकाऱ्यांकडून पंचानाम्यांना उशीर होत आहे.

तालुक्‍यातील भाजीपाला सतत साचलेल्या शेतातील पाण्यामुळे अक्षरश: सडल्याने बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. शेतीच्या पाण्याचा निचरा होण्याची मर्यादाच संपलेली असल्यामुळे शेतांमध्ये कमरेभर पाणी साचून शेतीला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे बाबत तालुक्‍यातील प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. प्रशासकीय यंत्रणेकडे वारंवार निवेदने देवूनही तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या व्यथा अधिकाऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याने नुकसान भरपाई मिळणार तरी कधी, असा सवाल संतप्त शेतकरी करू लागले आहेत. निवडणुकीच्या कामाचा प्रचंड ताण आहे, असे कारण पुढे करून पळवाटा शोधल्या जात होत्या. आता, निवडणुक संपुन आठवडा उलटून गेला तरी तालुक्‍यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.

पुरंदर तालुक्‍यातील शेतीच्या पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. निवडणूक कामे व त्यानंतर आलेल्या दीपावलीच्या सलग सुट्ट्यांमुळे शासकीय कामकाज करता आलेले नाही. मात्र, एक ते दोन दिवसात तालुक्‍यातील सर्व पंचनामे केले जातील. – रूपाली सरनोबत, तहसीलदार, पुरंदर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)