बीड : राज्यात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. करोना बाधितांच्या संख्येचा आकडा रोज वाढत आहे. तर दुसरीकडे मृत्यूच्या संख्येतही भर पडत आहे. यातच मृत्युमुखी झालेल्या लोकांना आपलेच लोक दूर करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना राज्यात घडली आहे रूढी-परंपरांना मूठमाती देत चार मुलींनी जन्मदात्या आईच्या अर्थीला खांदा दिला. एवढंच नाही तर पाचव्या मुलीने मुखाग्नी देत सर्व विधी पार पाडले.
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार जवळील जांब येथील रहिवासी लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे या महिलेचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यात लक्ष्मीबाई यांना मुलगा नसल्याने खांदा कोण देणार?, मुखाग्नी कोण देणार ? अशी चर्चा सुरू झाली. अस असताना लहान मुलगी समोर आली आणि मी मुखाग्नी देते म्हणाली. तर चारी मुलींनी खांदा देण्याचे ठरवल, त्यात कोरोनामुळे कमी नातेवाईक हजर असल्याने सर्वांनी ते मान्य केल. विशेष म्हणजे कोरोनाचे नियम पाळून मोजक्या लोकात हा अंत्यविधी पार पाडण्यात आला.
लक्ष्मीबाई यांच्या 4 मुली सुनिता केदार, विमलबाई केदार, शशिकला केदार आणि भीमाबाई मोरे या मुलीनी खांदा दिला. तर कचराबाई खंडागळे या मुलीने सर्व उर्वरित तयारी केली. दरम्यान, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत गावातील मंडळी, नातेवाईक यांच्यासमोर लक्ष्मीबाई यांच्या प्रेतास अग्नी दिला. या घटनेमुळे गावात व आसपासच्या परिसरात महिलांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आपल्याकडे असणाऱ्या सर्व रूढी परंपरा यांना छेद देत या पाच मुलींनी आईचा अंत्यसंस्कार केला आहे. परंपरेची बंधन झुगारून धाडस दाखवणाऱ्या या पाच बहिणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.