पुणे – करोनाने आतापर्यंत अनेक कुटुंबाचा आधार हिरावला. यात आणखी एक घटना शहरात समोर आली आहे. सदाशिव पेठेतील रहिवासी असलेल्या तीन सख्ख्या भावांचे करोनाने निधन झाले. प्रसिद्ध सराफ विश्वनाथ, ज्येष्ठ अभियंता अरविंद आणि ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ. रमेश नीलकंठ गोडबोले अशी या भावंडांची नावे आहेत. या घटनेने गोडबोले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
विश्वनाथ तथा दादा गोडबोले यांचे दि.17 एप्रिल रोजी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. वडिलोपार्जित सोने-चांदी सराफी व्यवसाय करताना सचोटी, खरेपणा, पारदर्शकता ही मूल्ये त्यांनी कायम जपली. 1968 मध्ये सोने नियंत्रण कायद्यामुळे काही काळ त्यांनी सराफी दुकान बंद ठेवले आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाले. याच काळात ते सीएआयआयबी आणि एआयबी या बॅंकिंग क्षेत्रातील
सर्वोच्च परीक्षा प्रथम क्षेणीत उत्तीर्ण झाले. त्यांच्या पश्चात पत्नी वसुधा, मुलगा डॉ. रघुनाथ, मुलगी विनया बापट तसेच सून, जावई, नातवंडं, पतवंडे असा परिवार आहे. तर ज्येष्ठ पिढीतील इंजिनियर अरविंद गोडबोले यांचे दि. 12 एप्रिल रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून बी.ई. (मेकॅनिकल) ही पदवी घेतली. नंतर जर्मन सरकारची शिष्यवृत्ती मिळवत तेथे शिक्षण घेतले.
मातृभूमीच्या ओढीने भारतात परत आले व त्यांनी 32 वर्षे किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरी केली. सोबतच पुणे विद्यापीठात त्यांनी 20 वर्षे जर्मन भाषेचे अध्यापन केले. त्यांच्या पश्चात मुलगी सौ. अनिता आपटे, मुलगा सुजय असा परिवार आहे.
तिसरे भाऊ ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ. रमेश गोडबोले यांचे 23 एप्रिल रोजी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. त्यांनी बी.जे.मेडिकल महाविद्यालयातून उच्च शिक्षण पूर्ण केले. गेली 55 वर्षे ते अलका टॉकीजशेजारील डॉ. गोडबोले लॅबोरेटरीचे संचालक राहिले आहेत. त्यांनी 30 वर्षे मधुमित्र या मासिकाचे संपादक म्हणून काम केले. ते निसर्गसेवक या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष होते. स्मृतीवन व स्मृती उद्यान हे दोन वनीकरण प्रकल्प पूर्ण करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. त्यांच्यामागे त्यांची दोन मुले, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. दोन्ही मुले व मुलगी त्यांची लॅबोरेटरीचे कामकाज बघत आहेत.