पुणे – लॉकडाऊनमुळे आंतरराज्य प्रवासास बंदी आहे. त्यावर व्हॉट्सऍप व्हिडिओ कॉलद्वारे न्यायालयात खटला निकाली काढण्यात आला. पती-पत्नीमध्ये असलेला वादाबद्दल हा दावा होता.
पती बंगळुरूला, तर पत्नी पुण्यात राहणारी त्यांचा विवाह 2007 मध्ये झाला व 2011 पासून त्यांच्यामध्ये घटस्फोटाचा दावा व इतर दावे सुरू होते. यातील एका दाव्यामध्ये पत्नीने न्यायालयामध्ये खोटा जबाब दिला.
त्यामुळे पतीने तिच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार सन 2015 मध्ये पुणे न्यायालयात वकील हेमंत झंजाड यांच्यामार्फत दाखल केली होती. यावर सुनावणी सुरू होती. दोघांनी तडजोड करावी, या उद्देशाने न्यायाधीशांनी दोघांनाही समज दिली.
त्यानुसार दोघांनीही चर्चा करून तडजोड करण्याचे ठरवले. त्यानुसार अर्जदार पतीने केलेली तक्रार मागे घेण्याचे ठरवले. परंतु तक्रार मागे घेताना एक तांत्रिक अडचण निर्माण झाली, की अर्जदार हे बंगळुरू येथे राहण्यास आहे. त्यात सध्या लॉकडाऊनमुळे आंतरराज्य प्रवासास बंदी आहे. त्यामुळे ते पुणे न्यायालयात उपस्थित राहू शकणार नव्हते.
त्यामुळे ऍड. हेमंत झंजाड यांनी न्यायालयाला विनंती केली, की सदर अर्जदाराचा जबाब हा व्हॉट्सऍप व्हिडिओ कॉलद्वारे नोंदविण्यात यावा. यावर न्यायाधीश जे. व्ही. भांडे यांनी मागणी मान्य करून व्हिडिओ कॉलद्वारे जवाव नोंदवून घेत हा दावा निकाली काढला.