जालना – दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबड पोलीस ठाण्यातील हेड काॅन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक पकडले आहे. महादू अप्पाराव पवार (वय 56, जालना) असे लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (दि.26) दुपारी अंबड रोडवरील पृथ्वीराज बार अँड रेस्टॉरंट येथे करण्यात आली. याबाबत 27 वर्षीय व्यक्तीने जालना एसीबीकडे तक्रार केली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून तक्रारदार यांच्या आई-वडिलांवर 20 जुलै 2023 रोजी अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात महादू पवार यांनी प्रतिबंधक कार्यवाही केलेली होती. तक्रारदार यांच्या आई-वडिलांवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी व अदखलपात्र गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी हेड काॅन्स्टेबल पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून बुधवारी एसीबीने जालना शहरातील अंबडवरील पृथ्वीराज बार अँड रेस्टॉरंट मध्ये सापळा लावला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून महादू पवार यांनी पंचांसमक्ष दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी जालना तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड काॅन्स्टेबल पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन कांबळे, जावेद शेख, शिवाज जमधडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गणेश बुजाडे, ज्ञानदेव झुंबड, आत्माराम डोईफोडे, गजानन खरात, संदीप लहाने, विठ्ठल कापसे, प्रवीण खंदारे यांच्या पथकाने केली.