‘जीव गेला तरी जमिनी देणार नाही’ ; विमानतळास पुरंदरसह बारामती तालुक्‍यातूनही विरोध

नायगाव  -पुरंदर तालुक्‍यातील पाच आणि बारामती तालुक्‍यातील तीन गावांमध्ये आता आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी शासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे आधीच विरोध असलेल्या पुरंदर तालुक्‍यासह आता बारामती तालुक्‍यातूनही शेतकरी विमानतळास विरोध करीत असून “जीव गेला तरी जमिनी देणार नाही, 

अशी भूमिका पुरंदरमधील रिसे, पिसे, राजुरी, नायगाव, पांडेश्‍वर तर बारामतीतील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, आंबी खुर्द अशा एकूण आठ गावांनी विरोध दर्शविला असल्याने आता प्रशासनाच्या समोरील चिंता वाढल्या आहेत.

विमानतळाला विरोध व पुढील दिशा ठरविण्यासाठी विमानतळ संघर्ष समितीच्या वतीने पांडेश्‍वर येथे मंगळवारी (दि. 15) रात्री बैठक पार पडली. त्यावेळी वरील आठही गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी माणिकराव झेंडे पाटील, अंकुश भगत, गणेश मुळीक, शशीभाऊ गायकवाड, विश्‍वास आंबोले, प्रताप रासकर, पोपट खैरे, नायगावचे सरपंच हरिदास खेसे, संजय जगताप (पांडेश्‍व), ऍड. भरत बोरकर, ऍड. किरण साळुंके, सदाशिव चौंडकर, महेश कड, अशोक गायकवाड, संतोष कोलते, प्रदीप खेसे, प्रताप रासकर, सुभाष चौंडकर, विपुल भगत, वैभव थिकोळे, शफीक शेख, सत्यवान भगत, महेंद्र खेसे, योगेश घाटे, प्रवीण कदम आदी उपस्थित होते.

शशीभाऊ गायकवाड म्हणाले लोकशाही व कायदेशीर मार्गाने लढा देऊ .सौ सोनार की एक लोहार की या पद्धतीने एकदाच मोठा मोर्चा काढू व शासनाला विमानतळ हटविण्यास भाग पाडू. अंकुश भगत म्हणाले शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी घेऊन विमानतळ नको.

आमदारांनी बागायती जमिनी जिरायती ठरवून विमानतळ आपल्याकडे लादले आहे. विश्‍वास आंबोले म्हणाले की ग्रामस्थांचा विरोध असेल तर विमानतळ होणार नाही असा आमदारांनी शब्द दिला आहे.

हरिदास खेसे म्हणाले की, पुरंदर तालुक्‍यातच विमानतळ नको आहे. नायगावच्या वतीने विमानतळास पूर्ण विरोध आहे. संजय जगताप (पांडेश्‍वर) म्हणाले की, जनाई शिरसाई योजना आणि पुरंदर उपसा सिंचन योजना यामुळे येथील क्षेत्र बागायती झाले आहे.

शासनाला चुकीची माहिती दिली गेली आहे. अशोक गायकवाड म्हणाले की शेतकऱ्यांनी आपली पीक पहाणी सातबारा उताऱ्यावर लावून घ्या. सदाशिव चौंडकर म्हणाले की आंदोलन करण्याचा लवकरात लवकर निर्णय घ्या.

ऍड. किरण साळुंके म्हणाले की, विमानतळ संदर्भात आपण सर्वांशी पत्र व्यवहार केले आहेत. काही माहिती उपलब्ध झाली आहे अजून काही माहिती उपलब्ध होत आहे. महेश कड म्हणाले की बागायती जमिनी व जिरायती जमिनी यांची तफावत असणारी माहिती शासनाला दिली आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने विमानतळाचा तीव्र निषेध करण्यात आला.

आमच्याकडे बागायती क्षेत्र असून अधिकाऱ्यांनी डोळे झाकून सर्व्हे केले आहेत का? बागायती क्षेत्र, फळबागा, गायी यांची संख्या अधिक आहे. बारामती तालुक्‍यातील तिन्ही गावांचा विमानतळाला विरोध आहे.
-ऍड. भरत बोरकर

आम्ही बारामतीतील तिन्ही गावाचे ग्रामस्थ विमानतळाच्या विरोधात आहोत.आमचा विमानतळा साठी जाहीर विरोध आहे. काहीही झाले तरी आम्ही आमच्या जमिनी विमानतळासाठी देणार नाही.
– पोपट खैरे, माजी सरपंच, चांदगुडेवाडी

शासनाला पूर्णपणे चुकीची माहिती पुरविली असून विमानतळाचा घाट आपल्यावर घालण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करीत आहेत. यासाठी ग्रामसभेचे ठराव घ्या. आपण लोकशाही आणि न्यायालयीन मार्गाने सर्व लढाया लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत विमानतळ होऊ देणार नाही.
– गणेश मुळीक, अध्यक्ष, विमानतळ संघर्ष समिती

मी स्वतः शेतकरी आहे. आपल्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत द्यायच्या नाहीत. शरद पवार यांच्याशी बोललो आहे. त्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आहे.आमचा जीव गेला तरी जमिनी द्यायच्या नाहीत. वेळ प्रसंगी आंदोलने, मोर्चे काढणार आहोत.
– माणिकराव झेंडे-पाटील, तालुकाअध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.