शेतकरी चिंतेत., ग्रामीण भागात पावसाची प्रतीक्षा कायम

बळीराजाचे डोळे आकाशाकडे

काऱ्हाटी  -राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी बारामती तालुक्‍यात अद्याप त्याच्या जोरदार सरी बरसलेल्या नाहीत. त्यापूर्वी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी दिल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे, त

र दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेतांची मशागत केली नाही, त्या शेतकऱ्यांच्या शेतीची मशागतदेखील आता अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा डीझेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक बैलजोडीच्या साह्याने शेतात मशागत करण्यावर भर दिला आहे, तर दमदार पावसासाठी बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

बारामती तालुक्‍यात 25 हजार हेक्‍टरवरील खरिपाच्या क्षेत्रावर बियाणे पेरले जाणार आहे. बियाणे खरेदीसाठी सध्या बाजारात धुमशान सुरू आहे. यंदाच्या खरीप हंगामात बाजरी, सूर्यफूल, कांदा, मूग, मटकी आदी पिके घेतली जाणार आहेत.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी खरीपपूर्व मशागतीच्या कामाला लागतो. पावसाळा सुरू होईपर्यंत नांगरणी, मोगडा, पाणी आदी मशागतीची कामे आटोपून तो पावसाची प्रतीक्षा करत असतो. या वर्षी मे महिन्यामध्ये अनेक वेळा अवेळी पाऊस झाल्याने पेरणीपूर्व कामाला उशिरा प्रारंभ झाला.

आता कामे पूर्ण झाली असली तरी पावसाने दडी मारल्याने पेरणीची कामे रखडली आहेत, तर काही शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या ओलीवरच पेरणी करीत जुगारही खेळला आहे. सध्या गरमी वाढली असली तरी शेतकरी कामाला लागले आहेत. मात्र, कामासाठी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, शेतकरी त्रस्त झाले आहेत.

पेरणीसाठी थांबा…
गेल्या काही वर्षांपासून जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. त्यामुळे मृग नक्षत्र लागले असले तरी यंदा हे संकट येऊ नये, याकरिता किमान 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्यावरच पेरणी करा, असे आवाहन शेतकऱ्यांना कृषी विभागाने केले आहे.

काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
यंदा मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, गेल्या दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हैराण झाला आहे. नाजूक पिकेही कोमेजून जात आहेत.

त्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले आहे. आभाळ दाटून येणाऱ्या ढगांकडे शेतकरी मोठ्या आशेने पाहत आहेत. त्यामुळे बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले आहे, तर अद्यापही काही भागात दुपारी उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.