– गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी
पिंपरी, दि. २५- पत्नीला घटस्फोट दे आणि माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावलेल्या प्रेयसीचा त्याने खून केला. त्यानंतर तो तब्बल १४ वर्ष पोलिसांना गुंगारा देत राहिला. अखेर गुन्हे शाखा युनिट एकने या प्रकरणाचा उलगडा केला असून आरोपीला अटक केली आहे.
आप्पा गेमाजी मोहिते (वय ५०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी येथे २१ एप्रिल २००८ रोजी आप्पा मोहिते याने एका महिलेचे अपहरण करून तिला त्याच्या घरात कोंडून ठेवले. तिथे तिची निर्घृणपणे हत्या केली आणि तो पसार झाला. आप्पा मोहिते तब्बल १४ वर्ष त्याचा ठावठिकाणा बदलून राहत होता. सुरुवातीला पोलिसांनी आप्पा मोहिते याच्या गावी तसेच सासुरवाडीत सापळा लावून त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही.
गुन्हेगारी टोळीचा होता सक्रिय सदस्य
आप्पा मोहिते हा प्रकाश चव्हाण टोळीचा सक्रिय सदस्य होता. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखा युनिट एकने प्रकाश चव्हाण टोळीच्या १४ वर्षांपूर्वी सक्रिय असलेल्या सदस्यांची माहिती काढून त्यांच्यामार्फत मोहिते याचा शोध सुरु केला. त्यात पोलिसांना महत्वपूर्ण माहिती मिळाली. मोहिते हा वाकी गावात राहत असून चाकण एमआयडीसी मध्ये मजुरीचे मिळेल ते काम करत आहे. पोलिसांकडे मोहिते याचा १४ वर्षांपूर्वीचा फोटो होता. त्यामुळे फोटोवरून त्याला ओळखणे अवघड होते. पोलिसांनी सापळा लावून शिताफीने शोघ घेत त्याला अटक केली. महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते. ती महिला मोहिते याला त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न कर. नाहीतर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होती. त्यामुळे तिचा खून केला असल्याचे त्याने सांगितले. आरोपी आप्पा मोहिते याला भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.