मुंबई – अभिनेता बॉबी देओलचं करिअर संपलं असं वाटत असताना दिग्दर्शक प्रकाश झा यांनी त्याच्यासोबत आश्रम सीरिजचे तब्बल तीन सिझन केले. यानंतर अभिनेता बॉबी देओल बॉलिवूडमध्ये पुन्हा चर्चेत आला. आता बॉबी पुन्हा एकदा मोठ्या निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे. यावेळी तो थेट मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे.
सलमान,अक्षय या बड्या अभिनेत्यांप्रमाणे बॉबीला देखील दाक्षिणात्य सिनेमाची भुरळ पडली आहे. ‘हरी हरा वीरा मल्लू’ या आगामी साऊथ चित्रपटात बॉबी औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. जबरदस्त ऍक्शनसह बिग बजेट असलेल्या या सिनेमात निगेटिव्ह रोल साकारणं बॉबीसाठी मोठं चॅलेंज असणार आहे. बॉबीसोबत या सिनेमामध्ये अभिनेता पवन कल्याण आणि निधी अग्रवाल हे देखील असणार आहे.
आश्रममध्ये बॉबीने साकारलेला बाबा निराला प्रेक्षकांना इतका भावला की पुन्हा एकदा बॉबीला निगेटिव्ह रोलमध्ये पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. क्रिश जगरलामुडी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. यापूर्वी हा रोल बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल साकारणार असल्याची चर्चा होती परंतु आता बॉबी औरंगजेबाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे निश्चित झाले आहे.