Lok Sabha Election 2024 – देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला, त्यांना शेपूट घालणं म्हणजे मर्दुमकी नाही. त्यांचा निषेध केला पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टोला लगावला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला.
धाराशिव आणि लातूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी अमित शहा हे शेपूट घालणारे गृहमंत्री आहेत, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ठाकरेंच्या याच टीकेवर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 370 कलम हटवले. जे स्वप्न होत ते त्यांनी पूर्ण करून दाखवले. तसेच, देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला, त्यांना शेपूट घालणे म्हणजे मर्दुमकी नाही. त्यांचा निषेध केला पाहिजे, अशा शब्दांत शिंदेंनी टीका केली.
याशिवाय, या फोटोग्राफरना शेपूट असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. त्यामुळे त्यांचे शेपटीबाबत जास्तीचे प्रेम वाढले आहे. वेळेप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्ली जाणारे, दिल्लीला लोटांगण घालणारे आणि नोटीस आली की घाम फुटणारे हे कोण आहे? तसेच, खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी सगळं सोडले.
बाळासाहेबांचे विचार सोडले, शेपूट कोणी घातले? हे सगळ्यांना माहीत आहे. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांना यांनी शिवाजी पार्कवर आणले. तसेच, याकूब मेननची कबर सजवणे हे कोणते देशप्रेम आहे?, असाही हल्लाबोल त्यांनी ठाकरेंवर केला.