अवघ्या १२ तासांत चारही आरोपींना अटक; वाकड पोलिसांची कामगिरी
पिंपरी (प्रतिनिधी) – तुरूंगातून सुटण्यासाठी मित्राने जामिनासाठी मदत केली. त्याची परतफेड करण्यासाठी मित्राच्या शत्रूवर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. हा धक्कादायक प्रकार थेरगाव येथे शुक्रवारी (दि. 5) रात्री घडला.
ऋषभ बालाजी गायकवाड (वय १८, रा. जगतापनगर, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुंड्या ऊर्फ किशोर ज्ञानदेव शेलार (रा. दुर्गा कॉर्नर बिल्डिंग, लिंकरोड, चिंचवड) सीजीन फिलिप जॉर्ज (वय २६, रा. जोतिबा मंगल कार्यालयामागे, काळेवाडी) रोहित ललन सिंग (वय २२, रा. पवनानगर कॉलनी, काळेवाडी) आणि सचिन सोनू साठे (वय २६ रा. गणराज कॉलनी, काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जॉर्ज आणि मयत ऋषभ यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. त्यावेळी ऋषभने केलेल्या मारहाणीमुळे जॉर्ज याच्या अंगावर व्रण उठला होता. याची आरोपी जॉर्जला सल होती. आरोपी गुंड्या याला जेलमधून सुटण्यासाठी जॉर्ज याने जामिनाकरिता मदत केली होती. या उपकराची परतफेड आरोपी गुंड्या याला करायची होती.
सर्व आरोपी एकत्र जमले असताना त्यांच्यात आरोपी जॉर्ज आणि ऋषभ याच्यात असलेल्या दुष्मनीचा विषय निघाला. त्याचवेळी आरोपींनी ऋषभ याचा काटा काढण्याचे निश्चित केले. त्यासाठी दोन-तीन वेळा त्यांनी प्रयत्नही केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. शुक्रवारी रात्री आरोपी पुन्हा एकत्र जमले. त्यावेळी त्यांनी संधी मिळताच थेरगाव येथे ऋषभ याच्या कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या ऋषभ यास तिथेच टाकून पळ काढला. जखमी ऋषभ यास रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर पळून गेलेल्या आरोपींबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावून अवघ्या १२ तासांत चारही आरोपींना अटक केली.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक हरीश माने, महेश स्वामी, अविनाश पवार, तानाजी भोगम, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, प्रणील चौगुले, शंभू रणवरे, कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, विक्रम जगदाळे, बापूसाहेब धुमाळ, जावेद पठाण, बाबाजान इनामदार, सुहास पाटोळे, प्रमोद भांडवलकर, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, नितीन गेंगजे, सुरेश सुतार, श्याम बाबा, नितीन ढोरजे, दीपक भोसले, प्रमोद कदम, सचिन नरुटे, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, अभिमन्यू बनसोडे, अन्वर मोमीन, अमोल दातार, सचिन जाधव, देवा वाघमारे, मोहिनी थोपटे, नूतन कोंडे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.