कराड – स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल असलेली महिला व तिच्या 9 दिवसांच्या बाळाची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यानंतर तिला डिस्चार्ज देऊन क्वारंटाइन करण्यासाठी विजयनगर येथील कृषि महाविद्यालयात पाठवले. मात्र, तेथे जागा नसल्याने संबंधित महिला व बाळास मुंढे-गोटे येथील तिच्या आईच्या घरी होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला. परंतु, तेथील गावकऱ्यांनी त्यांचा घरातील प्रवेश नाकारला.
दरम्यान, येथील मंडलअधिकारी महेश पाटील व गावकामगार तलाठी दत्ता काळबांडे यांनी संबंधित महिला व बाळाचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. त्यांच्याशी दुजाभाव करून नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करावी लागेल, अशा इशारा दिला. त्यानंतर महिला व बाळाला गृह प्रवेश मिळाला. लोकांनी करोनाबाधित अथवा अनुमानीत लोकांशी दुजाभाव करू नका, या माणुसकीच्या संदेशाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
वनवासमाची येथील करोनाबाधित रूग्णावर उपचार करताना दि. 30 एप्रिल रोजी उपजिल्हा रूग्णालयातील सहा परिचारिकांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. या परिचारिकांनी येथे प्रसुतीसाठी दाखल असलेल्या काही महिला रूग्णांवर उपचार केले होते. संबंधित महिला रूग्ण व त्यांची बाळे यांच्यासह सोबतीला असलेल्या सहकारी महिला अथवा कुटुंबातील सदस्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवण्यात आले. यात आगाशिवनगर येथील एका प्रसुती झालेल्या महिलेला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. उर्वरित सर्वांच्या स्वॅबचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
उपजिल्हा रूग्णालयात करोनाबाधित रूग्ण असल्याने येथील स्थानिक रूग्णांच्या नातेवाईकांनी आपले पेशंट होम क्वारंटाइन करण्यासाठी घरी घेऊन गेले. मात्र, अन्य जिल्ह्यातील तसेच ज्यांची राहण्याची सोय नाही, अशा प्रसुती झालेल्या महिला रूग्ण त्यांच्या नातेवाईकांसमवेत येथील उपजिल्हा रूग्णालयामध्ये आहेत.
दरम्यान, कवटेमंकाळ, जि. सांगली येथील गरीब कुटुंबातील महिला प्रसुतीसाठी दि. 26 एप्रिल 2020 रोजी उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाली. त्याच दिवशी त्या महिलेची प्रसुती होऊन तिला मुलगा झाला. प्रसुतीनंतर दोन दिवस तिचे बाळ काचेत ठेवण्यात आले होते. याचदरम्यान, आगाशिवनगर येथील करोना बाधित रूग्णाच्या निकट सहवासीत असलेल्या महिलेचे सीझर झाले. तिच्यासह उपजिल्हा रूग्णालयातील सहा परिचारिकांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे प्रसुती वॉर्डमधील सर्व महिला त्यांची बाळे त्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या महिलांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्या सर्व अनुमानीतांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने उपजिल्हा रूग्णालयाने निःश्वास सोडला. मात्र सर्वांना 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आले आहे.
कवटेमंकाळची महिला व बाळाचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना दि. 4 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. क्वारंटाइनसाठी त्यांना विजयनगर येथील कृषि महाविद्यालयात पाठवण्यात आले. येथील महाविद्यालयात 50 रूग्णांची क्षमतेचा विलगीकरण कक्ष आहे. येथे जागा नसल्याने संबंधित महिला व बाळाला तिच्या आईच्या घरी जवळच मुंढे-गोटे गावात नेण्यात आले. परंतु, करोनाच्या दहशतीखाली गावकऱ्यांनी त्यांना घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. अखेर मंडलाधिकारी महेश पाटील, तलाठी दत्ता काळबांडे यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याशी संपर्क साधला.
अशा पध्दतीने दुजाभाव करता येणार नाही. लोकांना समजून सांगा अन्यथा कायदेशीर कारवाई करा अशी सूचना तहसीलदार वाकडे यांनी दिल्या. त्यानंतर पाटील व काळबांडे यांनी कारवाईचे हत्यार उपसताच संबंधित महिला व बाळाला घरात प्रवेश देण्यात आला.
अरे, गड्यांनो…माणुसकी जपा
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी करोनाबाधित असो वा अनुमानित यांना माणुसकीची वागणूक द्या. त्यांच्याशी कोणताही दुजाभाव करू नका. अशा सक्त सूचना दिल्या आहेत. आरोग्य व प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे काटेकोरपणे पालन करण आपले कर्तव्य आहे. योग्य काळजी घेतल्यास करोनाला आपण रोखू शकतो, हे आता स्पष्ट झाले आहे. यासाठी माणुसकी जपा असा संदेश अत्यंत महत्वाचा आहे.