पुणे – विद्यार्थ्यांनो यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला शिस्त लावा. न्यूनगंड बाळगू नका. स्वतःमधील ‘स्व’ला ओळखा. छोट्या छोट्या संकटांना घाबरून मागे राहू नका. निर्णय कोणताही घ्या चूक असो वा बरोबर पण निर्णय घेण्याचे प्रयत्न आणि धाडस सतत केले पाहिजे यातून आयुष्यात आपल्याला स्वतःला संयम राखता येईल आणि स्वतःवर ताबा ठेवता येईलच.
यासाठी स्वतःमध्ये बदल घडवायला शिकले पाहिजे. यासाठी कृती आणि दृष्टी म्हणजेच ॲक्शन अँड विजन स्वतःची स्वतःला तयार करता आली पाहिजे. स्व आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आव्हाने स्वीकारा. असे मत प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांनी व्यक्त केले. खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यानिमित्त ते बोलत होते.
यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, राजेश भुतडा, फेंगसे, टिळेकर, रमेश अवस्थे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, स्नेहसंमेलन प्रमुख अर्जुन मुसमाडे यांसह महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक मा. कृष्णकुमार गोयल म्हणाले की, संघर्षातून मोठे व्हा आणि आयुष्याच्या भव्य दिव्य स्वप्नांना गाठा”.. यासाठी सतत भव्य दिव्य स्वप्न पहा स्वप्नांच्या मागे जगण्याचे कौशल्य शिका तरच तुम्ही आयुष्यात खूप मोठे व्हाल असा अतिशय प्रभावी संदेश गोयल यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी 168 विद्यार्थ्यांना व 22 शिक्षकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे अहवाल वाचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी केले तर प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख डॉ अर्जुन मुसमाडे, यांनी केले. आभार लेल्ले यांनी मानले.