विनयभंग : शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
न्हावरे – येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या महिलेला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करणाऱ्या डॉक्टरवर शिरूर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामहरी भुजंगराव लाड (रा. न्हावरे, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. शिक्रापूर येथील एक 20 वर्षीय महिला पोटात दुखत असल्यामुळे न्हावरे येथील डॉक्टर रामहरी लाड याच्या नाथकृपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रविवारी (दि. 9) आली होती. दरम्यान तपासणी करत असताना डॉक्टर लाडने त्या महिलेकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच असभ्य वर्तन करून मनात लज्जा निर्माण होईल अशी वर्तणूक केली. याबाबत संबंधित महिलेने शिरूर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे करीत आहेत.
- कडक कारवाईची मागणी –
न्हावरे येथील डॉक्टरबाबत परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वैद्यकीय पेशाला काळीमा फासणाऱ्या डॉक्टरवर कडक कारवाई व्हावी, तसेच त्याचा वैद्यकीय परवानाही रद्द करण्यात यावा, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.