गंगा ओशियन सोसायटीसह परिसरातील नागरिकांचा सवाल
कात्रज – कात्रज परिसरात राजस सोसायटीकडून सुखसागरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गंगा ओशियन सोसायटी समोरील बाजूस मोकाट डुकरांचा वावर वाढला आहे. महानगरपालिकेने “वराह पालनाची योजना’ या रस्त्यावर राबविली आहे का? असा सवाल सोसायटीसह परिसरातील नागरिंकांकडून केला जात आहे.
सुखसागर नगर परिसरासह गंगा ओशियन सोसायटी परिसराकडे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पूर्णपणे दर्लक्ष आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह सोसायटीतील ही 250 सदनिकांधारकांना या “वराह पालन योजने’चा त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत सोसायटीचे सचिव सुरेश जोशी यांनी सांगितले की, डुकरांचा त्रास वाढल्याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला सोसायटीकडून लेखी तक्रार देण्यात आली आहे. परंतु, यासंबंधी कुठल्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याने या ठिकाणी डुकरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
रस्त्यावरून येता-जाता ही डुकरे रस्त्यांवरून गाडीला कळपानेच आडवी येतात. यातून अपघात घडले आहेत. सोसायटीसमोर रस्त्यांवर या डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यातून मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. महानगरपालिकेने वराह पालनाची ही योजना योग्य ठिकाणी राबवावी, असा टोला नागरिकांडून पालिका प्रशासनाला लगावला जात आहे.
महापालिकेच्या मुख्य खात्याकडून डुकरे पकडण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. त्या भागातील कचरा उचलण्यात आला आहे. नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. नागरिकांनी रस्त्यावर ओला कचरा टाकू नये. यातून मोकाट डुकरे अन्नाच्या शोधात रस्त्यावर येतात.
– मंगलदास माने, आरोग्य निरिक्षक, महानगरपालिका