मुंबई – हिम्मत असेल तर फिल्मसिटी उत्तर प्रदेशला नेऊन दाखवा, असं म्हणत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खुलं आव्हान दिलं आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने आयोजित केलेल्या ऑनलाईन चर्चासत्र उद्घाटन प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी योगींवर निशाणा साधला.
देशातील सर्वात मोठी फिल्मसिटी उत्तर प्रदेशात बनवणार असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकेचा बाण सोडलाआहे.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, बाॅलिवूड इंडस्ट्रीला सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारकडून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. दादासाहेब फाळके यांनी ज्या भूमीत चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली, त्याठिकाणी तुम्हाला मी काहीही कमी पडू देणार नाही. मुंबई फिल्मसिटीमध्ये लवकरच आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.