- एकूण कर्ज 176 कोटी 30 लाख 97 हजार रुपये
- राखीव किंमत 131 कोटी
पिंपरी – पिंपरीतील हिंदुस्तान ऍन्टीबायोटिक्स कंपनीच्या नेहरुनगर येथील मोकळ्या 12 एकर 9 गुंठे जागेचा लिलाव होणार आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या पुण्यातील अरोरा टॉवर्स येथील अस्ती वसुली शाखेने याबाबतची नोटीस बजावली आहे.
पिंपरीतील एचए कंपनी हा केंद्र सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील पहिला उपक्रम आहे. या कंपनीला 1997 साली आर्थिक घरघर लागल्याने, केंद्र सरकारने ही कंपनी आजारी कंपनी म्हणून जाहीर केली. त्यावेळी 135 कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले होते. त्यानंतर केंद्र सरकारकडून वेळोवेळी मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यावरच कामगारांचे तकति वेतन अदा करण्यात आले आहे. सध्या कंपनीच्या मालकीची एकूण 263 एकर जागा असून, त्यापैकी केंद्र सरकारकडून 87.7 एकर जागा विक्रीची परवानगी मिळाली आहे.
कंपनीने विविध कारणांसाठी पंजाब नॅशनल व अन्य बॅंकाकडून घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी शिखर बॅंक म्हणून पंजाब नॅशनल बॅंकेची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या 87.7 एकर जागेची विक्री करण्याची परवानगी मिळाल्याने या जमिनीचे मूल्यांकन करण्याचे काम राष्ट्रीय बांधकाम निर्माण महामंडळाकडून (एनबीसीसी) केले जात आहे. मूल्यांकनाचे काम लॉकडाऊनमुळे रखडले आहे. लॉकडाऊननंतरच या प्रक्रियेला गती येणार आहे.
जमीनीच्या विक्रीतून कंपनीला 800 कोटी मिळण्याची शक्यता आहे. त्यामधून बॅंका व अन्य सरकारी देणी भागविली जाणार आहेत.
केंद्रीय रसायन मंत्रालयाच्या समन्वयाने मेटल ट्रेड स्क्रॅप कॉर्पोरेशन लि.( एमएसटीसी) च्या माध्यमातून जमिनीचा लिलाव केला जाणार आहे. मात्र 2013 ते 2019 या सहा वर्षांच्या कालावधीत अनेकदा प्रयत्न करुनही या जमिनीची विक्री होऊ शकलेली नाही. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने यापैकी काही जागेवर आरक्षण टाकले आहे.
एचए कंपनीने घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले असून, पंजाब नॅशनल बॅंकेने या जागेच्या लिलावाची नोटीस काढली आहे. मात्र. अद्यापही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. केंद्र सरकारने विक्रीची परवानगी दिलेल्या 87.7 एकर जमिनीपैकी 12.9 एकर जागा आहे.