मुंबई – दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. समंथा ‘मायोसिटीस’ या आजाराशी झुंज देत आहे. मागील वर्षी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली होती. त्यानंतर ती अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत तिने एक पोस्ट शेअर करत गेल्या सहा महिन्यातील तिच्या कठीण काळातील अनुभव शेअर केला आहे.
इनस्टाग्रामवर समंथाने तिचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे सर्वांत लांब आणि सर्वांत कठीण सहा महिने होते. अखेर त्याचा अंत केला आहे.’ समंथाची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहत्यांनी तिच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. मायोसिटीस या आजारामुळे समंथाच्या आरोग्यावर बराच परिणाम झाला आहे. याच कारणामुळे तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास वर्षभर ती कोणत्याच प्रोजेक्टवर काम करणार नसून फक्त तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. यासाठी तिने आगामी चित्रपटांसाठी घेतलेली ॲडव्हान्स रक्कमसुद्धा निर्मात्यांना परत केल्याचे म्हंटले जात आहे.
काही महिन्यांपुर्वा समंथाच्या एका फोटोने काही लोक हैराण झाले आहेत. सामंथाचा हॉस्पिटलमधला एक फोटो पाहून लोक अस्वस्थ झाले होते. एका थेरपी दरम्यानचा अभिनेत्रीचा हा फोटो व्हायरल झाला होता. ऑटोइम्यूनसाठी ‘हायपरबेरिक थेरपी’ दरम्यान तिने तो फोटो काढला होता.
दरम्यान, समंथा रुथ प्रभू ‘शाकुंतलम’ सिनेमातही दिसली. त्यानंतर आता ती लवकरच ‘सिटाडेल’ ही सिरीज रिलीज होणार आहे. यामध्ये तिच्यासोबत वरुण धवनची मुख्य भूमिका आहे. तर तिचा आणि विजय देवरकोंडाचा ‘खुशी’ सिनेमाही प्रदर्शित होणार आहे.