पुणे : 8 फेब्रुवारी 1963 रोजी हैदराबाद येथे जन्मलेला मोहम्मद अझरुद्दीन हा भारताकडून खेळलेल्या महान फलंदाजांपैकी एक होता. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळ कारकीर्द अचानक संपुष्टात येण्यापूर्वी त्याने 99 कसोटी आणि 334 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. अझरुद्दीन हा मनगटी मनगटी फटके खेळण्याच्या शैलीमुळे जगाने पाहिलेला सर्वात आकर्षक फलंदाजांपैकी एक होता.
आज अझहरचा 59 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अझहरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील खास विक्रमांवर नजर टाकणार आहोत.
1) पहिल्या तीन कसोटीत सलग तीन शतके :
शैलीदार आणि मैदानी फटक्यांनी प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवणार्या मोहम्म अझरुद्दीनने त्याच्या कसोटी कारकिर्दीतीची सुरुवात धमाकेदार केली होती. त्याने पहिल्या तीन कसोटीत सलग तीन शतके झळकावली होती. अशी कामगिरी करणारा तो जगातिल एकमेव फलंदाज आहे. 1984-85 मध्ये, त्याने कोलकाता येथे इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. या सामन्यात त्याने 110 धावा केल्या. त्यानंतर चेन्नई येथे 105 आणि कानपूर येथे 122 धावा करत क्रिकेट विश्वात पाऊल टाकले.
2) तीन विश्वचषकांमध्ये भारताचे नेतृत्व :
अझरुद्दीन हा एकमेव भारतीय कर्णधार आहे ज्याने तीन विश्वचषकांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. अझहरने 1992, 1996 आणि 1999 या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व केले. कपिल देव आणि श्रीनिवास वेंकटराघवन आणि एमएस धोनी यांनी प्रत्येकी दोन वेळा एकदिवसीय विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले आहे.
3) पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतक :
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतक करणार्या काही मोजक्या फलंदाजांमध्ये अझरुद्दीनचाही समावेश आहे. अझरुद्दीनने कोलकाता येथे इंग्लंडविरुद्ध 110 धावा करून कारकिर्दीची सुरुवात केली होती. तर 2000 मध्ये बंगलोर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 99व्या आणि शेवटच्या कसोटीत त्याने 22वे शतक झळकावले.
4) सर्वाधिक एकदिवसीय सामने :
अझहरच्या शेवटच्या सामन्यापर्यंत, त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 334 सामने खेळण्याचा विक्रम होता. माजी कर्णधाराने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत सात शतके आणि 58 अर्धशतके झळकावली आहेत.
पुढे विक्रम हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा झाला, सचिन सर्वाधिक 463 सामने खेळला आहे.
5) ईडन गार्डन्सवर धावांचा पाऊस :
अझरुद्दीनने 1984-85 मध्ये कसोटी पदार्पणात 110 धावा केल्यापासून ईडन गार्डन्सवर त्याच्या पूर्ण कारकिर्दीत दमदार कामगिरी केली आहे. त्याने या मैदानावर एकूण सात कसोटी खेळल्या, त्यामध्ये पाच शतके आणि दोन अर्धशतकांसह 107.50 च्या सरासरीने 860 धावा केल्या आहेत. केवळ एका कसोटी सामन्यात त्याला पन्नासहून अधिक धावसंख्या करण्यात अपयश आले.