आळंदी-करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम – हॉटेलात काम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेताना आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन गिलबिले आणि मित्र परिवाराच्या वतीने गरजूंना 21 दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप करण्यात येत आहे.
आळंदी शहरातील इंद्रायणी नगर, तापकीर नगर, देहू फाटा भागातून गरजू लोकांची यादी बनवण्यात आली असून, कोणालाही यासाठी घराबाहेर जावे लागणार नाही. त्यांना घरपोच हे शिधा सामान दिले जात आहे. आज व उद्या हे वाटप केले जाणार असून आणखी कोणी गरजू असल्यास त्यांनी नगरसेवक सचिन गिलबिले आणि नगरसेवक दिनेश घुले यांना संपर्क करावा, कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, तूरडाळ, चटणी, हळद आणि भाजीपाला हे साहित्य गोळा करून ते गरजूंना वाटप करण्यात यावे. याचप्रमाणे आळंदी शहरातील आजी माजी नगरसेवकांनी, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत या गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे, अशी भावना व्यक्त होत आहे.