कराड -मलकापुरात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह इतर असे 14 जण करोनाबाधित आढळले आहेत. शहरात 39 दिवसात पुन्हा 131 रुग्ण वाढले असून शहरातील रुग्णसंख्या 162 वर पोहोचली आहे. येथील कृष्णा हॉस्पिटलचे कर्मचारी व त्यांचे निकट सहवासित बाधित झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मलकापुरात पुन्हा करोनाचा दुसरा टप्पा 39 दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात 21 एप्रिलला आगाशिवनगर येथे पहिला करोनाग्रस्त युवक सापडला होता. त्यामुळे मलकापूर नगरपालिका कार्यक्षेत्रात भीतीचे वातावरण तयार झाले होते. परंतु, करोना लढ्याचे योग्य नियोजन व उपचाराने एक महिन्यातच 26 एप्रिलला शहरातील सर्व 31 रुग्ण बरे झाल्याने शहर करोनामुक्त झाले.
एक महिन्याच्या विश्रांतीनंतर दि. 26 जूनला खंडोबानगरध्ये हॉस्पिटलमधील कर्मचारी महिला करोनाबाधित झाल्याने मलकापुरात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला. टप्याटप्प्याने करोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. मात्र, यावेळी सर्वसामान्य नागरिकांऐवजी विविध शहरांतून आलेले प्रवासी, डॉक्टर, हॉस्पिटल कर्मचारी व त्यांचे निकट सहवासितांचे पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
शहरातील करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या निकट सहवासितांसह कृष्णा हॉस्पिटल येथील पाच आरोग्य कर्मचारी असे दोन दिवसांत शहारात 14 जण बाधित आढळले.
बाधितांमध्ये वयोवृद्धांपेक्षा मध्यमवयीन व तरुणांची संख्या जास्त आहे.
दोन दिवसांतील 14 बाधितांसह दुसऱ्या टप्प्यात केवळ 39 दिवसांत पुन्हा 131 रुग्ण वाढून शहरातील रुग्णसंख्या 162 वर पोहोचली आहे. त्यामुळे मलकापूर शहरातील कारोना बाधित रुग्णसंख्येने दीडशेचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे मलकापूर वासियांत भीतीचे वातावरण आहे.