गुटख्याच्या ‘पिचकाऱ्या’ ३६०० कोटींच्या

पळसदेव – राज्यात गुटख्याच्या अर्थकारणाचा व्याप 3600 कोटी रुपयांचा होता. गुटखा विक्रीच्या रूपाने शासनाच्या तिजोरीत सुमारे 100 कोटीहून अधिक महसूल जमा होत होता. राज्यभरातील तरुण, मध्यमवर्गीय पिढीला व्यसनापासून रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुटखा व पानमसाला उत्पादन, विक्री, साठवणूक यावर 2002मध्ये बंदी घातल्यानंतर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले मात्र आजही राज्यभरात शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही गुटखा विक्रीचे प्रमाण घटलेले नाही.

याउलट बंदीनंतरही तेवढीच उलाढाल या धंद्यांत होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जाते. वर्षभरात राज्याच्या ग्रामीण भागात अवैधपणे 3600 कोटींचा गुटखा विक्री होत असल्याचा अंदाजही काही विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यालगत असलेल्या इंदापुरात गुटख्याचा धंदा तेजीत असतो, पुणे-सोलापूर महामार्गावर अनेकदा पोलीसांनी कारवाई करीत लाखोंचा माल जप्तही केलेला आहे. इंदापूर तसेच लगतच्या दौंड तालुक्‍यातून रेल्वेद्वारे गुटखा राज्यभरात पाठविला जात असल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्र विधीमंडळात अन्न, सुरक्षा व मानत अधिनियम 2006 या कायद्यातील तरतुदीनुसार गुटखा व पान मसाला पदार्थ उत्पादन, विक्री, साठवणूक, वितरण यावर बंदी घालण्यात आली आहे. शासनाने केलेल्या पाहणीद्वारे 1 कोटी 80 लाख लोक आजही रोज गुटखा खातात. पाच ते साडेपाच हजार युवक रोज नव्याने गुटखा खायला शिकतात, असा धक्कादायक निष्कर्ष एका समाजसेवी संस्थेने काढला आहे. विशेष म्हणजे बंदीनंतर ही आकडेवारी 25 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.

गुटखा बंदीला जसे सामाजिक, आरोग्य असे वेगवेगळे अंग आहेत. तसेच त्यामागील अर्थकारण मोठे आहे. महाराष्ट्रात गुटख्याची तब्बल 3600 कोटी रुपयांची उलाढाल आजही होते. याउलट बंदीनंतर ती वाढत असल्याचे ग्रामीण भागातील विक्रेते सांगतात. बंदीपूर्वी सुरवातीला गुटख्याची एक पुडी 10 टक्के कमिशन देऊन जात होती, त्यापुढे सबडिलर 5, होलसेल 4 टक्के व पान टपरी विक्रेता यास 15 ते 20 पैसे एक पुडी विकल्यामागे मिळत होते. याची वर्षाची गोळाबेरीज केली तर वर्षाला गुटखा शौकीनाला 36 ते 40 हजार मोजावे लागत होते. मात्र, गुटखा बंदीमुळे या आकडेवारीत वाढ झाली आहे. कारण, सध्या ग्रामीण भागात गुटख्याची पुडी 25 ते 30 रूपयांनाही विकली जाते. यातून होणारी उलाढाल कमी होण्याऐवजी वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे.

बंदीनंतरही कोट्यवधींचा साठा?
शासनाकडून बंदी आदेश लागू असला तरी अद्याप कोट्यवधी रुपयांचा गुटखा, पानमसाला बाजारपेठेत आढळून येतो. गुटखा बंदी नंतमर साठविलेल्या गुटख्याला “तस्करी’चा भाव चढतो. गुटखा बंदी झाल्यानंतर या धंद्यातील उलाढाल वाढीस लागली आहे. बाजारपेठेत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालाच्या विक्रीची यंत्रणाही कार्यरत आहे. व्यापारी, पानपट्टी चालकांसह अन्न, औषध प्रशासन अधिकारी यामध्ये आहेत की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)