पळसदेव – पळसदेव तालुका इंदापूर येथील मुख्य बाजारपेठेतील अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्या अखेर भरण्यात आल्या. अनेक वेळा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केल्यावर ठेकेदाराने केवळ एक किमी अंतरावरील साईडपट्ट्या माती टाकून भरून घेतल्या आहेत. त्यामुळे पुन्हा हा रस्ता चर्चेत आला आहे.
ठेकेदाराने साईडपट्ट्या भरताना मुरूम टाकण्याऐवजी चक्क माती टाकून साईडपट्ट्या भरल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. साईडपट्ट्या भरताना ठेकेदाराने मुरूम टाकणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराने केवळ काम उरकणाच्या हेतून माती टाकून बाजारपेठेतील साईडपट्ट्या भरण्याचं काम पूर्ण केलं आहे. अद्याप डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्या भरण्याचं काम तसेच बाकी ठेवण्यात आले आहे.
या बाबत बोलताना उपसरपंच कैलास भोसले म्हणाले की, ठेकेदाराला स्थानिक भागात मुरूम उपलब्ध असताना त्यांनी ही माती बारामतीवरून आणली की भरणेवाडीवरून आणली, माहिती नाही. मात्र, साईडपट्ट्याचे कामं माती टाकून झालं आहे, याची चौकशी व्हावी. यावर पाणी मारलं नाही किंवा ते चोपण्याचं देखील काम केलं नाही. त्यामुळे या कामाबाबत तातडीने चौकशी होण्याची गरज असल्याचं मत या वेळी त्यांनी व्यक्त केलं.
तरी ठेकेदाराने पुन्हा या साईडपट्ट्या मुरूम टाकून भराव्यात व बाजारेठेतील काम सोबत हवालदार चौक शेलारपट्ट्यापर्यंत बाकी रस्त्याचं देखील मुरूम टाकून साईडपट्ट्याचं काम करावं व ते व्यवस्थित चोपून घ्याव, अशी मागणी स्थानिक नागरिक बबन बनसुडे यांच्यासह या भागातील नागरिक व व्यापारी करत आहेत.