शौकिनांचा अजूनही बैलगाडा शर्यतीचा नादच खुळा

वधु-वराच्या गाडीवर फुलांमधून साकारली बैलगाड्याची प्रतिकृती

आळेफाटा – गेल्या काही वर्षांपासून शासनाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली आहे; मात्र बैलगाडा शर्यतींचा नादच खुळा असल्याचे चित्र अद्यापही गामीण भागात पाहायला मिळत आहे. नवरी मुलीला मिरवणाऱ्या चारचाकी गाडीच्या बोनटवर हुबेहूब बैलगाडा शर्यतींची अंत्यत देखणी मांडणी करून जणू काही शासनाला बैलगाडा शर्यती पुन्हा चालू करण्याविषयीचा परखड संदेश पोहचवला आहे.

जुन्नर तालुक्‍यातील कल्याण- नगर महामार्गावरील एका कार्यालयात रविवारी (दि. 8) खामुंडी (ता. जुन्नर) येथील नवरी मुलीच्या लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवरीमुलीचे ज्या गाडीतून आगमन होणार होते, ती गाडी आकर्षक फुले व पानांनी सजविण्यात आली होती; मात्र गाडीच्या बोनटवर राज्यभरात ग्रामीण भागात अल्प कालावधीत वेड लावलेल्या बैलगाडा शर्यतींची केलेली हुबेहूब मांडणी सर्व वऱ्हाडी मंडळींचे खास आकर्षण ठरली. गाडीवर करण्यात आलेल्या लक्षवेधी आगळ्यावेगळ्या सजावटीकडे ये – जा करणारे पाहुणे मंडळी कुतूहलाने कटाक्ष टाकताना बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होतील की नाही, या विषयी रंगतदार चर्चा करताना निदर्शनास येत होती.

काही वर्षांपूर्वी प्रामुख्याने खेड, आंबेगाव, जुन्नर व नंतर सर्वत्रच बैलगाडा शर्यती यात्रा-जत्रा मधून आपणास पाहायला मिळत होत्या. बैलगाडा शर्यती आहेत म्हणून यात्रा असलेल्या गावात अनेक जिल्ह्यातील बैलगाडा मालक व शर्यतप्रेमी मोठ्या संख्येने हजेरी लावत असत. मोठ्या संख्येने जमा झालेल्या यात्रेकरूंमुळे यात्रा स्थळावर छोट्या छोट्या व्यावसायिकांना धंदा होऊन मोठे आनंदी वातावरण तयार व्हायचे, सर्जा राजाची बैल जोडी शर्यतबंदी झाल्यापासून कुठेही नजरेस पडायला तयार नाही परिणामी सर्जा राजाची घाटात शर्यतीसाठी पळणारी प्रतिकृतीची मांडणी करणे या व्यतिरिक्त आज बैलगाडा प्रेमींच्या हातात काहीही उरलेले नाही.

राजकारण्यांचे दुर्लक्ष
बैलगाडा शर्यती पुन्हा चालू करू असे निवडणूक प्रचारात ठणकावून सांगणारे निवडणुका संपल्यावर बैलगाडा शर्यतीविषयी गप्प असल्याची चर्चा यावेळी पाहुण्यांमधून कानावर आली आहे. बैल या प्राण्याचे जीवापाड जतन करणाऱ्या व वर्षभरातील कष्टप्रद जीवन थोडे बाजूला सारून शेती कामातून थोडी उसंत मिळावी म्हणून सुरू झालेल्या बैलगाडा शर्यतीवर अचानक बंदी घातल्यामुळे शर्यतप्रेमीमध्ये नाराजी पसरली असल्याचेही निदर्शनास येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)