लातूर – लातूरमधील गंजगोलाई परिसरात टाकलेल्या छाप्यात तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरट्या मार्गाने गुटखा विक्री आणि साठा सुरु आहे. यातील गुटखा किंगला लातूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी चांगलाच दणका दिला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाकडून लातूर शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे. गंजगोलाईतील एका दुकानात गुटखा आणि सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी प्रेम एजन्सी या दुकानावर छापा टाकला. तसेच शहरातील विविध गोदामांचीही तपासणी केली. यात सव्वा कोटी रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा सापडला.
गंजगोलाईतील प्रेम एजन्सीच्या नावे असलेल्या एका दुकानावर आणि त्याने भाडे तत्त्वावर घेतलेल्या विविध गोदामांवर पोलिसांनी धाडी टाकल्या. ही कारवाई सलग दोन दिवस सुरू आहे. यात हाती लागलेल्या गुटख्याची मोजदाद केल्यानंतर तो तब्बल 1 कोटी 25 लाख रुपयांचा असल्याचे समोर आले आहे.