गांधीनगर – राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी गुजरातमधील मेहसाणा येथे एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोपूर्वी त्या व्यक्तीने राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप आहे.
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती तिरंग्यावर पाय ठेवताना दिसत आहे, असे पोलिसांनी सांगितले. सोमवारी मेहसाणामध्ये केजरीवाल यांनी तिरंगा यात्रा काढली होती. या रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज आणण्यात आले होते.
समोर आलेला व्हिडिओ जुन्या बसस्थानकाजवळील असल्याचे पोलिसांनी सांगितले. यादरम्यान आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी शहरात पोहोचलेल्या आप समर्थकांना तिरंगा आणि पक्षाचे झेंडे वाटताना दिसले. यादरम्यान एक व्यक्ती राष्ट्रध्वजाचा अपमान करताना दिसली.
राष्ट्रीय ध्वजाचा अपमान (सुधारणा) कायदा, 2003 च्या कलम 2 अंतर्गत शहराच्या ए-विभाग पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.