अहमदाबाद – शुभमन गिलची शतकी खेळी व महमद शमी आणि मोहित शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेत सोमवारी झालेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा 34 धावांनी पराभव केला. या विजयाच्या जोरावर गुजरातने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत प्लेऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला.
गुजरातने विजयासाठी दिलेल्या 189 धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. महंमद शमी व यश दयाळ या जोडगोळीने हैदराबादची अवस्था एकवेळ 4 बाद 29 अशी अत्यंत बिकट केली होती. सलामीवीर अनमोलप्रीत सिंग, अभिषेक शर्मा व राहुल त्रिपाठी यांनी खेळपट्टीवर केवळ हजेरी लावली. कर्णधार एडन मार्करमही अवघ्या 10 धावा काढून परतला. यावेळी हेनरीच क्लासेनने चमक दाखवली. मात्र, सानवीरला मोहित शर्माने बाद केले. याच षटकात मोहितने अब्दुल समदलाही बाद करत हैदराबादचा डाव 6 बाद 49 असा आणखी अडचणीत आणला.
मार्को जेन्सनने एक धाव घेत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मोहितने जेन्सनलाही बाद करत आपल्या बळींची संख्या तीन केली. क्लासेन एकाकी लढत देत होता. त्याने भूवनेश्वर कुमारच्या साथीत आठव्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी करत संघाचे शतक फलकावर लावले. त्याने आपले अर्धशतकही थाटात साकार केले. त्यानंतर तो 64 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 44 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार फटकावले. दुसरीकडे मोहितने भूवनेश्वर कुमारला बाद करत चौथा बळी मिळवला. त्याने 26 चेंडूत 3 चौकारांसह 27 धावांची खेळी केली. मयंक मार्कंडेयनेही 9 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह नाबाद 18 धावा केल्या. गुजरातकडून शमी व मोहितने प्रत्येकी 4 गडी बाद केले.
तत्पूर्वी, सलामीवीर शुभमन गिलने स्पर्धेच्या इतिहासातील आपले पहिलेच शतक साकार केले. त्याने साई सुदर्शनसह शतकी भागीदारी केली. मात्र, त्यानंतरही सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सचा डाव 9 बाद 188 असा रोखला गेला. हैदराबादकडून भूवनेश्वर कुमारने अखेरच्या षटकात 3 तर सामन्यात एकूण पाच गडी बाद केले.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्सला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर फलंदाज वृद्धिमान साहा खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला. त्यानंतर मात्र, शुभमन गिलने साई सुदर्शनसह संघाचा डाव सावरताना अर्धशतक फलकावर लावले. या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. गिलने अर्धशतकी पल्ला पार केला. त्याने सुदर्शनसह शतकी भागीदारी केली व 10व्या षटकातच संघाचे शतक फलकावर लावले. या जोडीने दुसऱ्या गड्यासाटी 147 धावांची भागीदारी केली.
सुदर्शन 47 धावांवर बाद झाला व ही जोडी फुटली. त्याने 36 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावला. यावेळी गिलने कर्णधार हार्दिक पंड्याच्या साथीत संघाला दीडशतकी मजल मारून दिली. मात्र, पंड्या पुन्हा एकदा अपयशी ठरला. पाठोपाठ डेव्हीड मिलरनेही निराशा केली. राहुल तेवतिया अपयशी ठरला. गिलने शतक साकार केले. मात्र, शतक पूर्ण झाल्यावर तो लगेचच परतला. त्याने 101 धावांच्या खेळीत 58 चेंडूंचा सामना करताना 13 चौकार व 1 षटकार फटकावला. यानंतर रशीद खानलाही भूवनेश्वरने तंबूचा रस्ता दाखवला. पाठोपाठ नूर अहमद धावबाद झाला तर त्यानंतरच्या चेंडूवर महंमद शमीला भुवनेश्वरने बाद करत पाचवा बळी मिळवला.
लक्षवेधी
गुजरात संघाचा नव्या जर्सीत खेळ
आयपीएलमधील गिलचे पहिलेच शतक
साई सुदर्शनसह महत्त्वपूर्ण शतकी भागीदारी
तब्बल सात जीवदानानंतरही सुदर्शनचे अर्धशतक हुकले
भूवनेश्वर कुमारचे पाच बळी
शमी व मोहितचे प्रत्येकी 4 बळी
क्लासेची एकाकी झुंज
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स – 20 षटकांत 9 बाद 188 धावा. (शुभमन गिल 101, साई सुदर्शन 47, भूवनेश्वर कुमार 5-30). सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 9 बाद 154 धावा. (हेनरीच क्लासेन 64, भूवनेश्वर कुमार 27, महंमद शमी 4-20, मोहित शर्मा 4-28).