मुंबई – डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांच्या मॅच विनिंग खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर 6 गडी राखून सहज विजय मिळवला. बेंगळुरूने दिलेल्या 171 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात गुजरातने चार विकेट गमावून 19.3 षटकांत 174 धावा करत विजयाची नोंद केली. या विजयासह गुजरातने आयपीएल प्लेऑफचे पहिले तिकीट पक्के केले आहे.
आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात 16 गुणांसह प्लेऑफ फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे. गुजरातच्या रोमांचक विजयात डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी नाबाद 79 धावांची भागिदारी केली. तसेच शुभमन गिलने 31 आणि वृद्धिमान साहाने 29 धावांचे छोटेखानी योगदान दिले. निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातसाठी साहा आणि गिलच्या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनतर नियमित अंतराने चार विकेट गमावून संघ बॅकफूटवर पडला. कर्णधार हार्दिक पांड्याही फारसे काही योगदान देऊन शकला नाही. तो अवघ्या तीन धावांत बाद झाला.
यानंतर मिलर आणि तेवतियाच्या जोडीवर पुन्हा संघाला विजय मिवळून देण्याचे दडपण आले. मात्र, दोघांनी याचा भार पडू न देता आक्रमक फलंदाजी करून संघाला विजयीरेषा ओलांडून देत संघासाठी प्लेऑफचे तिकीट कन्फर्म केले. बेंगळुरूकडून शाहबाज अहमद आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार फाफ डू प्लेसिस खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर पाटीदार आणि कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. रजत 52 धावा करून बाद झाला. तर कोहलीने 58 धावांची सर्वाधिक खेळी केली. तसेच मॅक्सवेलने 18 चेंडूत 33 धावांचे छोटेखानी योगदान दिले. गुजरातकडून प्रदीप सांगवानने दोन विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक ः
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 6 बाद 170 (विराट कोहली 58, रजत पाटीदार 52, ग्लेन मॅक्सवेल 33, महिपाल लोमरॉर 16. प्रदीप सांगवान 2-19, रशिद खान 1-29, महंम्मद शमी 1-39)
गुजरात टायटन्स – 19.3 षटकांत 4 बाद 174 (वृद्धीमान साहा 29, शुबमन गिल 31, डेव्हिड मिलर नाबाद 39, राहुल तेवतिया नाबाद 43. शाहबाज अहमद 2-26, वानिंदू हसरंगा 2-28)