अहमदाबाद – आम आदमी पार्टीने मंगळवारी आगामी गुजरात निवडणुकीसाठी आपल्या 10 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यात आदिवासी, मागास आणि अनुसूचित जाती समुदायाच्या सदस्यांचा समावेश आहे. गुजरातमधील निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करणारा आम आदमी पक्ष हा पहिला पक्ष ठरला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. पण या निवडणुका डिसेंबर मध्ये होतील असे सांगण्यात येत आहे.
पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गीर सोमनाथ जिल्ह्यातील एका रॅलीला संबोधित केल्यानंतर उमेदवारांची ही घोषणा केली. येथल सभेत केजरीवाल यांनी गुजरात मधील प्रत्येक बेरोजगाराला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
या यादीत गुजरात आपचे उपाध्यक्ष भीमाभाई चौधरी यांना बनासकांठा जिल्ह्यातील देवदार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, दुसरे राज्य उपाध्यक्ष जगमल वाला हे सोमनाथ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अर्जुन राठवा आणि सागर रबारी या दोन अन्य राज्य उपाध्यक्षांना अनुक्रमे छोटाउदेपूर (एसटी) आणि बेचराजी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आप उमेदवारांची दुसरी यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. आम आदमी पक्षाने राज्यातील सर्व 182 मतदार संघातून उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.