अंदाज


घर असो की एखादी संस्था वा व्यवसाय, यात व्यवस्थापन हा पाया असतो. जगातील सर्वात उत्तम व्यवस्थापक म्हणजे गृहिणी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व कामांचे काटेकोरपणे नियोजन करून येणारा प्रत्येक दिवस सार्थकी लावण्यास महिला उत्तम व्यवस्थापन करतात. घरात किती माणसं आहे त्यानुसार त्यांच्या कामाची विभागणी करून लहान मुलांची कामे, मोठ्यांची कामे, वृद्धांची कामेही त्या लीलया पार पाडतात. विश्‍वातल्या सर्वोत्तम व्यवस्थापकाकडून आपण काही गोष्टी शिकूयात. त्याचा उपयोग कसा करून घेता येईल हे पाहूया.

संगीताचं कालच लग्न झालं होतं. दाखवणे, पत्रिका पाहणे, पसंती, खरेदी, साखरपुडा व लग्न या गडबडीत खूप वेळ गेला. लग्न म्हणजे समारंभ, सजणं! तीन महिने यात कसे गेले ते कळलंच नाही. आई, काकू अशा सगळ्या अधूनमधून “सासरी हे नि ते, असं नि तसं’ टाइप सूचना देत होत्या, पण संगीताला त्याकडे लक्ष द्यावसं वाटलं नाही. “ऊं… त्यात काय एवढं? करू वेळ येईल तेव्हा.’ लग्नाच्या रात्री प्रवास करून सगळे जण उशिरा परत आले. दमणूक इतकी झाली होती की पटापट झोपीच गेले. घर किती मोठं आहे, कुठं काय आहे हे पाहण्याची वेळ किंवा संधी मिळाली नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर भराभर आटोपून संगीता नव्या घराच्या स्वयंपाकघरात आली. तिकडे तीन बायका आधीच काम करत होत्या. नव्या उत्साहात संगीतानं न्याहरी करण्याचं काम स्वतःकडे घेतलं. तिचं मन मोडायचं नाही म्हणून इतर तिघी म्हणजे सासू, काकू व आजी तिला हवं ते कर म्हणाल्या. कधी तरी एकदा संगीतानं माहेरी थालीपीठ केले होते आणि सगळ्यांना आवडले होते. आता तोच पदार्थ करूया असं तिनं ठरवलं. घरात त्यावेळी लहानमोठी धरून किमान पंधरा माणसं होती. तिला हवं ते सगळं सामान काढून देऊन इतर तिघी बाजूला झाल्या व आपल्या इतर कामाला लागल्या.

माहेरी मोजक्‍या तीन जणांसाठी करण्याची सवय असलेल्या संगीताला पंधरा जणांसाठी किती लागेल याचा अंदाज येईना. पाचपट करू म्हणजे होईल असं ठरवून ती कांदा चिरू लागली. कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर अशी कच्ची तयारी करायलाच तिला वीस मिनिटं लागली. भाजणीत हे साहित्य व इतर घटक घालून मळता मळता पीठ पाणी करत त्याचा हा थोरला गोळा झाला. पीठ फुलून आलं. चव बघून तिखट मीठ पाहताना आपण बरोबर करतो आहोत ना? या शंकेनं ती डळमळत होती. पण पहिलाच प्रयत्नात आपण विशेष काही करून दाखवूयात म्हणून तिनं इतर तिघींची मदत वा सल्ला घेण्याचं टाळलं.
गॅसच्या शेगडीवर एका वेळी दोन तवे ठेवून तिनं शक्‍य तितक्‍या गतीनं थालीपीठ करायला सुरुवात केली. एकाच वेळी थापणे, तव्यावर भाजणे, दही व सॉस यासोबत बाहेर नेऊन देणे यात तिची चांगलीच तारांबळ उडाली. प्रयत्न पहिलाच असला तरी चवीला चांगली झाली होती. मंडळींनी मनसोक्‍त खायला सुरुवात केली.

इकडे थालीपीठ करून व देऊन संगीता दमत चालली. तिला स्वतःलाही भूक लागली होती पण सगळ्यांना दिल्याशिवाय कसं खायचं? म्हणून ती मुकाट्यानं करत राहिली. तासभरापेक्षा अधिक काळ गेला तरी हे न्याहरी प्रकरण आटोपेना. आता मात्र संगीता रडकुंडीला आली. शिवाय शेगडी अडकून पडल्यानं पुढच्या स्वयंपाकासाठी बाकीच्या खोळंबल्या होत्याच. शेवटी आजींना तिची अवस्था पाहवेना. त्यांनी मायेनं तिच्या पाठीवर हात ठेवला. संगीताला रडूच फुटलं.
आजी म्हणाल्या, रडू नकोस. तू केलेलं थालीपीठ छानच झालं आहे. फक्‍त असे पदार्थ कमी माणसं असताना आणि भरपूर वेळ हाताशी असताना करायचे असतात. घाईच्या वेळी आणि खाणारे अधिक असताना उपमा, पोहे असे झटपट होणारे ठोक पदार्थ करायचे असतात. आता तू हात धुऊन खाऊन घे. पुढचे आम्ही पाहतो.’

सुटकेचा श्‍वास सोडत संगीतानं स्वयंपाकघरातून तात्पुरता पाय बाहेर घेतला. संसाराचा पहिला धडा ती आज शिकली.
नवीन कामाला पहिल्यांदाच हात घालताना अनुभवी व्यक्‍तींचा सल्ला जरूर घ्यावा. आपल्या क्षमतेचा अंदाज नसताना एकदम मोठ्या कामाला हात घालू नये.
गृहिणी ही जगातील सर्वोत्तम व्यवस्थापक मानली जाते. एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचे तिचं कौशल्य वादातीत आहे. कुठल्याही एका सकाळची वेळ घेतली तर त्या त्या वेळी ती नेमकी किती कामं करते ते पाहूया.

– नळाला पाणी आले असल्यास पिण्याच्या पाण्याची साठवणीची भांडी जसे की पिंप, घागर वगैरे घासून त्यात पाणी भरणे.
– स्वयंपाक करणे ज्यात कणिक मळून पोळ्या करणे, कुकर लावणे भाजी चिरून फोडणीस घालणे, वरण/आमटी करणे, चटणी, कोशिंबीर करणे.
याच्या जोडीनं सकाळच्या न्याहरीचा एक किंवा अधिक पदार्थ करणे.
– चहा, कॉफी, दूध इत्यादी करणे व देणे.
– मुलांची आंघोळ, दप्तर भरणे, डबा भरणे, शूज, सॉक्‍स, युनिफॉर्म इत्यादी पाहणे.
– पती व स्वतःच्या ऑफिसची तयारी, डबा, कपडे ही तयारी करणे.
– स्वच्छता, झाडांना पाणी घालणे.

ही यादी आपण हवी तितकी वाढवू शकतो. यात कामाला येणारे मदतनीस जसे की स्वयंपाकीण, भांडी, केर, फरशी करणारी मोलकरीण आणि घरातील इतर सदस्यांची मदत गृहीत धरली तरीही मुख्य नियोजन त्या त्या घरातील स्त्रीचं असतं. वरील यादीतील प्रत्येक काम सुटे सुटे विचारात घेतले तर त्या अंतर्गत करावयास लागणाऱ्या छोट्या छोट्या कामांची एक वेगळी आणि लांब यादी होऊ शकते. उदाहरणार्थ, पोळ्या करणे.

घर व सदस्य यांची मूळ संख्या कायम असली तरी ती वेळपरत्वे कमीअधिक होत असते. आज डबा हवा, नको, भाकरी हवी, पाहुणे आलेत, उरलेल्या शिल्लक आहेत का, रात्रीच्या पण करून ठेवायच्या का? हे दैनंदिन बदलणारे पर्याय निवडून परातीत कणिक घ्यायची. त्यात बदलत्या मापानं तेल, मीठ व पाणी घालून हवी तशी म्हणजे घट्ट, पातळ अशी कणिक मळून ठेवायची. एक गोळा घेऊन त्याला तेलपीठ लावून घडी मग पुन्हा गोळा करून पोळी लाटायची, गॅस कमी जास्त करत हवी तशी भाजायची व तव्यावरून उतरून डब्यात ठेवायची. पोळी करणे या एका कामात किती उपव्यवधानं पाळण्याची गरज असते हे, ही यादी वाचून लक्षात येईल. शिवाय हे करताना मुख्य यादीतील इतर कामं देखील सुरूच असतात.

या सगळ्यात तिचं यांत्रिकपणे काम करणं गृहीत धरलेलं आहे. शारीरिक किंवा मानसिक समतोलात इतर काही बिघाड हा जमेस धरलेला नाही. ती इतरांचे आजारपण काढते पण स्वतःच्या आजारपणात देखील तिला घरकाम करावे लागते. अशी रोजच तारेवरची कसरत करणाऱ्या गृहिणीसारख्या यशस्वी व्यवस्थापकाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

सुचरिता

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.