ट्रेन क्रॅश

आपल्या व्यवसायात यशस्वी असलेला एक छोटा उद्योजक. ह्याचा उद्योग काय? …तर मोठमोठे भंगार विकत घेऊन ते इतर कंपन्यांना विकणे. रेल्वे ऍक्‍सिडेन्ट होतात, तेव्हा त्या रेल्वेची मोडतोड झालेली असते. त्याचा मग लिलाव पुकारला जातो. हा अभिमानाने सांगतो की, मला मालाची बरोबर किंमत कळते. नेहमी लिलावामधे मी जिंकतो. माझेच टेंडर पास होते. मला बरोबर हव्या त्या भावात माल मिळतो. पुढे तो म्हणतो, आणि हेच बायकांबाबतही होते. मला स्त्रिया वश होतात. स्त्रियांबाबतचा माझा अंदाज कधी चुकीचा निघत नाही.

अलीकडेच एका लांबच्या गावी रेल्वेचा अपघात झालेला आहे. त्याचा लिलाव जाहीर होतो. हा टेंडर पाठवतो. याला तिथे हजर होण्यास सांगणारे पत्र येते व त्याप्रमाणे तो तिथे पोचतो. टॅक्‍सी ड्रायव्हरला एखाद्या चांगल्याशा हॉटेलमधे घेऊन चलायला सांगतो. पण तो म्हणतो, “चांगलेसे हॉटेल? मुश्‍किल है. एक तर या गावात पाण्याचे दुर्भिक्ष. लहान गाव, कोण येणार या गावात.’ ह्याचे म्हणणे असते, “मला सगळी चांगली व्यवस्था पाहिजे. पैसे जास्त गेले तरी चालेल.’
टॅक्‍सीवाला म्हणतो, “गावात एक चांगलं मोठं घर आहे. तिथे एकटीच बाई राहते. तिथे तुमची चांगली व्यवस्था होईल. सगळ्या सोयीसुविधा उत्तम आहेत तिथे.’ हा म्हणतो, “जेवण वगैरे चांगलं मिळेल ना?’ “उत्तम… सुगरण आहे ती बाई. चला, तुम्हाला तिकडेच घेऊन जातो.’

एका सुरेख मोठ्या बंगल्यापाशी तो टॅक्‍सी थांबवतो. दोघे उतरतात. तो ड्रायव्हर पुढे जाऊन दार वाजवतो. एक देखणी बाई दार उघडते. तो म्हणतो, “हे साहेब आलेत. एकदोन दिवसांसाठी त्यांना खोली पाहिजे.’ ती म्हणते, “कसं शक्‍य आहे? उद्या पाहुणे येणार आहेत ना माझ्याकडे? बरीच स्वच्छता करायचीय. स्वयंपाकाची तयारी करायचीय.’ तो म्हणतो, “त्यांना चांगल्या ठिकाणी जागा हवीय. कामाचं काही नाही, त्यांची मदतच होईल तुम्हाला.’ ती बरं म्हणते. ती त्याला त्याची खोली दाखवते आणि थोड्या वेळानं चहाला खाली यायला सांगते. तो येतो तेव्हा तिचे घर आवरणे, सजवणे चालू असते. तो म्हणतो, “कोण येणारेत पाहुणे?’ ती उत्तरते, “माझे पती. तेरा वर्षांनी तुरुंगातून सुटून येतायत ते.’ ती बोलत असते, काम करत असते. त्याचीही मदत घेते. संध्याकाळी म्हणते, आम्ही नेहमी जिथे भेटायचो, तिथे जायचे का? दोघे जातात. ती सांगते की, त्याचा स्वभाव फार चांगला आहे. आमचे एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. आम्ही नाटकात काम करायचो. हुशार आहे फार. एकदा नाटकाचा प्रयोग करून आम्ही घरी येत असताना वाटेत एकाने माझी छेड काढली. मारामारी झाली. माझ्या नवऱ्याने मारलेले त्याच्या वर्मी लागले व त्या मवाल्याचा मृत्यू झाला. ह्याला शिक्षा झाली. पण तो स्वभावानं फार चांगला आहे.

तो सगळं ऐकून घेतो. तिचा अंदाज घेत असतो. ती त्याच्याशी पुष्कळ बोलत असते, त्याच्याबरोबर फिरते, काम करते. पण तिच्या बोलण्यात सतत तिच्या पतीच्या आठवणी असतात. रात्र होते. त्याला तिच्याबद्दलचे आकर्षण गप्प बसू देत नाही. तो शेजारीच असलेल्या तिच्या खोलीत येतो. ती कपाटातून कपडे काढत म्हणते, “तो इथून गेला तेव्हा त्याला निरोप देताना मी जे कपडे घातले होते, तेच उद्या घालणार आहे. आपल्या डोळ्यासमोर तेच रूप असते ना… मलाही आठवते, त्याने काय घातले होते, कसा दिसत होता… त्यालाही मी तशीच दिसत असणार.’ सतत त्याचा विषय, त्याच्या आठवणी. हा जो उद्योजक आहे, तो पुढे होतो, काही सूचक बोलतो. ती त्याला कितपत प्रतिसाद देतेय, याची चाचपणी करतो. त्याचा हेतू तिच्या लक्षात येतो. ती त्याचे रात्रीचे जेवणाचे ताट डायनिंग टेबलवर झाकून ठेवते आणि त्याला रुक्षपणे सांगते, “जेवण करून घ्या. मला उद्या लवकर रेल्वे स्टेशनवर जायचेय त्याला घ्यायला.’ आणि झटकन तिथून बाहेर पडते. ह्याचा अपेक्षाभंग होतो. हा खोलीत जाऊन विमनस्कपणे वेळ काढतो.

सकाळी आवरून तो बाहेर येतो. ती कुठेच दिसत नाही. तेवढ्यात तो टॅक्‍सी ड्रायव्हर येतो. “साहेब, चलायचे ना?’ तो विचारतो. तो ड्रायव्हरजवळ तिची चौकशी करतो. सगळीकडे त्याची नजर भिरभिरत असते. निघण्यापूर्वी एकदा तिला भेटायचे असते. शेवटी तो फारच आग्रह धरतो, तेव्हा तो ड्रायव्हर त्याला सांगतो, “कसलं काय साहेब, अहो त्या रेल्वेचा जो ऍक्‍सिडेन्ट झालाय ना, त्यात बरीच माणसं मेली. त्यातच हिचा नवरापण होता. तेव्हापासून तिच्या डोक्‍यावर परिणाम झालाय. तो येणार म्हणून सारखी वाट पाहत असते.’ हे ऐकताच तो सुन्न होतो. आपला ह्या बाईबाबतचा अंदाज सपशेल चुकला हे त्याच्या लक्षात येते. लिलावाकडे फिरकतही नाही आणि म्हणतो, “ह्या वेळी मी पहिल्यांदाच माझे टेंडर गमावले.’ शेवटी दिलेल्या कलाटणीमुळे कथेचा सारा मोहराच बदलतो आणि आपण पुन्हा त्या फिल्मचा नव्याने विचार करू लागतो. यातच “ट्रेन क्रॅश’चे यश आहे.

माधुरी तळवलकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.