नवी दिल्ली – विमानांना लागणारे इंधन जीएसटीत आणण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन असल्याची माहिती विमान वाहतूक खात्याचे सचिव प्रदीपसिंह खोसला यांनी आज दिली. विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी दृकश्राव्य माध्यमातून आज जी बैठक झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
विमानांच्या इंधनाचे भाव प्रचंड वाढले आहेत. विमान कंपन्यांचे त्यामुळे कंबरडे मोडले आहे. आधीच देशातील सर्व विमान कंपन्या तोट्यात आहेत, त्यातच इंधन दरवाढीमुळे त्यांचे अधिकच हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर हे इंधन जीएसटी करप्रणालीत आणावे अशी विमान कंपन्यांची मागणी आहे. त्या संबंधात बोलताना खोसला म्हणाले की, आम्ही हा विषय अर्थमंत्रालयाकडे उपस्थित केला आहे. तेथे त्यावर विचार सुरू आहे. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चापैकी 45 ते 55 टक्के खर्च इंधनावर होतो. त्यावर खोसला म्हणाले की आम्ही अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांपुढे हा प्रस्ताव मांडला असून त्यांच्या संमती नंतर तो जीएसटी कौन्सिलकडे सोपवला जाणार आहे. तेथे त्यावर अंतिम निर्णय होईल असे ते म्हणाले.