नवी दिल्ली – कृषी कायदे रद्द करा या मागणीसाठी गेले दोन महिने दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज पॉप गायिका रिहाना आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनी दिलेल्या समर्थनामुळे वेगळाच आयाम मिळाला आहे.
या दोघींनी ट्विटरवर या आंदोलनाला समर्थन देणारे संदेश प्रसारित केल्यानंतर जगभरातून भारतातील या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. हजारो लोकांनी या दोघींचे ट्विट संदेश रिट्वीट केले. त्यामुळे सरकार हबकले असून त्यांनी लगोलग त्याच्या विरोधात आपले निवेदन जारी करून या दोघींना व अन्य सेलिब्रेटींना कोणतीही माहिती न घेता प्रतिक्रया देऊ नका असा इशारा दिला आहे.
जगातील अत्यंत लोकप्रिय समजल्या जाणाऱ्या रिहाना नावाच्या पॉप गायिकेने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत या शेतकऱ्यांचे एक छायाचित्र ट्विट केले. आपण या विषयावर का बोलत नाही असा सवाल तिने यात केला आहे. त्याच बरोबर तिने फार्मर्रस प्रोटेस्ट हा हॅशटॅग चालवला. त्याला जगभरातून पाठिंबा मिळाला आणि तो टॉप ट्रेडिंगमध्ये आला.
त्या पाठोपाठ ग्रेटा थनर्बग हिनेही भारतातील शेतकरी आंदोलनाला माझा पाठिंबा असे नमूद करीत ट्विट केले. शेतकऱ्यांचे आंदोलन दाबून टाकण्यासाठी इंटरनेट बंदी केली जात आहे, शेतकऱ्यांवर दडपण आणण्यासाठी त्यांची रस्त्यावर खिळे ठोकून नाकेबंदी केली गेली आहे वगैरे माहितीचा संदर्भही तिने ट्विटवर जोडला.
त्यामुळे तिच्या ट्विटलाही जगभरातून समर्थन मिळाले. आणि एकाएकी भारतातील शेतकऱ्यांचे आंदोलन हा एक जागतिक विषय बनले. हे पाहून सरकार हबकले आणि विदेश व्यवहार मंत्रालयाने या प्रकरणात एक तातडीने निवेदन जारी केले.
त्यात भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे की, अशा प्रकारच्या कोणत्याहीं विषयावर सोशल मिडीयावर प्रतिक्रीया देण्या आधी संबंधीत व्यक्तींनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी. कोणतीही माहिती न घेता अशा प्रकारचा संदेश प्रसारीत करणे, योग्य आणि जबाबदारीचे ठरत नाही. भारतात सुरू असलेल्या या आंदोलनला काही मर्यादित स्वरूपाचाच पाठिंबा आहे ते संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचे आंदोलन नाहीं असेही विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.