मिलान, (इटली) – पर्यावरण बदलाला रोखण्यासाठीच्या उपाय योजनांसाठी निधी उपब्ध न करून दिल्याबद्दल आणि केवळ निरर्थक बडबड केल्याबद्दल युवा पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग आणि व्हेनेसा नकाते यांनी आंतरराष्ट्रीय समुदायावर कडवट टीका केली आहे. इटलीतील युवा पर्यावरण परिषदेच्या हेतूविषयी देखील या दोघींनी संशय व्यक्त केला आहे.
इटलीतील मिलान शहरात 180 देशांमधील तब्बल 400 युवा पर्यावरण प्रेमीं कार्यकर्त्यांची तीन दिवसांची परिषद आयोजिकत करण्यात आली आहे. या परिषदेतील ठरावांच्या आधारे संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यावरण परिषदेसाठी शिफारसी पाठवल्या जाणार आहेत. संयुक्त राष्ट्राची जागतिक पर्यावरण परिषद 31 ऑक्टोबरपासून स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणार आहे.
मात्र या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे आणि युवा पर्यावरण परिषदेला व्यापक अधिकृत भूमिका देण्यात यावी, अशी या युवा कार्यकर्त्यांची मागणी आहे.केवळ युवा कार्यकत्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे, असे भासवण्यासाठीच युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात युवा कार्यकर्त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेतले जात नाही आहे. जगभर वायू उत्सर्जन सुरूच आहे. त्यावर कोणतेही नियंत्रण नाही, असे थनबर्ग म्हणाली.
वातावरण बदलाचा परिणाम होणाऱ्या देशांसाठी 100 अब्ज युरो उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही. उलट कॅलिफोर्निया आणि ग्रीसमधील वणवे, जर्मनी आणि बेलजियममधील पूरस्थितीमुळे वातावरण बदलाचा परिणाम सर्वत्र होतो आहे, हेच स्पष्ट झाले आहे, असे युगांडातील युवा पर्यावरण कार्यकर्ती 24 वर्षीय व्हेनेसा नकाते हिने म्हटले आहे.