बारामती (प्रतिनिधी) – गंभीर भाजलेल्या मुलाला दवाखान्यात घेऊन जात असताना मास्क नसल्याने पोलिसांनी अडवून कारवाई केल्याने बारामती वकील विरुद्ध पोलीस असा गट आमने-सामने आल्याची घटना आज बारामतीत घडली.
गंभीर भाजलेल्या मुलाला मोटारीतून दवाखान्यात नेणाऱ्या ॲड अतुल पोपट भोपळे यांना बारामती शहर पोलिसांच्या वाहतूक कर्मचाऱ्यांनी धमकावल्याची तक्रार ॲड. भोपळे यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक, आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे. या घटनेनंतर बारामतीतील वकिल संघटनेच्या सदस्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. धमकावणाऱया पोलिसावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी वकिल संघटनेकडून करण्यात आली आहे.
मास्क न घातल्याच्या कारणावरून एका कर्मचाऱयाने त्यांना पावती फाडायला लावली. पावती फाडल्यानंतर अॅड. भोपळे यांनी अनेक नागरिक विनामास्क जात आहेत, माझ्यावरच कारवाई का? अशी विचारणा केली. त्यावर एका कर्मचाऱ्याने त्यांचे गचुरे पकडत त्यांना पोलिसांच्या वाहनात नेवून बसवले आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने बारामतीत शहर पोलीस ठाण्यात वकिलांनी गर्दी केल्याचे चित्र होते.
अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा देखील इशारा बारामतीच्या वकील संघटनेकडून देण्यात आल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.